अजितदादा व एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 17:20 IST2025-10-30T17:19:12+5:302025-10-30T17:20:30+5:30
भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा फक्त वापर करणार आहे, वापर करून झाल्यावर त्यांना फेकून देणार आहे

अजितदादा व एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही - रोहित पवार
पुणे : ज्यांना राजकारण कळते, त्यांना हे माहिती आहे, की भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात भाजपला कुणाच्या कुबड्याची गरज नाही, असे म्हणतात. याचा अर्थ अजितदादा व एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपला राहिलेली नाही. त्यामुळे २०२९ पूर्वी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर स्वगृही परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही, ते स्वगृही परततील, असे भाकीत आमदार रोहित पवार यांनी केले.
बनावट आधार कार्ड तयार केल्याच्या संदर्भात भाजपच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून आ. पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी गुरुवारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कार्यालय परिसरात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजकारण ज्या लोकांना समजते त्यांना ऑपरेशन लोटस जेव्हा झाले, तेव्हा तीन वर्षापूर्वीच कळाले आहे. की, भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीचा फक्त वापर करणार आहे. वापर करून झाल्यावर त्यांना फेकून देणार आहे. अमित शहा म्हणाले कुबड्यांची गरज नाही. दुसरीकडे अजित दादांचे व एकनाथ शिंदे यांचे नेते भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे दोघांनाही २०२९ पर्यंत स्वगृही परतण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी मी पॅन कार्ड तयार केल्याचे वक्तव्य केले. बहुतेक त्यांना आधार कार्ड म्हणायचे असेल. मुख्यमंत्री बोलल्यानंतर दोन तासात भाजपच्या कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला. मत चोरी कशी केली जाते, त्यावर मी प्रत्यक्षिक दाखवले, म्हणून कसा काय गुन्हा दाखल होऊ शकतो. हा गुन्हा होऊ शकत नाही, असे पोलिसांनी सांगितले असेल, त्यामुळे गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये माझे नाव स्पष्टपणे घेतले नाही. मात्र, एकंदरीत परिस्थिती पाहता, माझ्यावर थेट गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. दाखल गुन्ह्यात पंधरा दिवस चौकशी होणार आहे. यामध्ये खोट्या कागदपत्राचा गौरवापर करणे, मानहानी करणे, धार्मिक जातीय वाद निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, चिथावणी देणे, अशी कलमे लावली आहेत. त्यांनी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करू देत, आम्ही घाबरणार नाही, त्यांच्या धमक्यांना भीक टाकणार नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
व्हीएसआयला बदनाम करण्याचा डाव
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही प्रतिष्ठीत संस्था आहे. मागील वर्षाचा लेखाजोखा दिल्याशिवाय पुढील वर्षाचे अनुदान मिळत नाही. असे असताना संस्थेच्या चौकशीची आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणतात आदेश दिले नाही. या माध्यमातून संस्थेला बदनाम करण्याचा डाव रचल्याचा आरोपही पवार यांनी केला.
तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार टाकावा
निवडणूक आयोग भाजपचा एक विभाग झाला आहे, मतचोरी होत आहे. जोपर्यंत व्हीव्हीपॅड येत नाही. मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत सर्व विरोधी पक्षांनी येणाऱ्या प्रत्यक निवडणुकीवर बहिष्कार टाकायला हवा, असेही पवार म्हणाले.