अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकरण समोर; मुलीच्या आई आणि पतीसह अकरा जणांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:16 IST2022-12-09T15:15:32+5:302022-12-09T15:16:17+5:30
मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही देखील तिचा विवाह केल्याचा प्रकार घडला

अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्यानंतर प्रकरण समोर; मुलीच्या आई आणि पतीसह अकरा जणांविरोधात गुन्हा
बारामती : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही देखील तिचा विवाह केल्याचा प्रकार घडला आहे. या मुलीने एका मुलाला जन्म दिल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोडणी कामगाराची ही मुलगी असून तिने नुकताच एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर ही बाब पुढे आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,संबंधित मुलीने यासंबंधी फिर्याद दिली. ती सध्या १५ वर्षे ५ महिने वयाची आहे. याप्रकरणी संबंधित मुलीने ससून हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल असताना शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक संध्याराणी देशमुख व डॉ. वृंदा अग्रवाल यांच्यासमोर जबाब दिला आहे. त्यानुसार तिचा पती, सासरे, चुलत सासरे, चुलत दीर, तिचे वडील, आई, आजोबा व आजी यांच्यावर बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिचे आई-वडील ऊसतोडणीचे काम करतात. सध्या ते बारामती परिसरात वास्तव्यास आहेत. आत्याच्या मुलाशी तिचा १५ जून २०२१ रोजी विवाह लावण्यात आला. तिचा पती हा ऊसतोडणीचेच काम करतो. विवाहानंतर तिला दिवस गेले. त्या स्थितीत ती पतीसोबत अंथुर्णे (ता. इंदापूर) भागात ऊसतोडणीसाठी आली. १ डिसेंबर रोजी तिला त्रास होऊ लागल्याने बारामतीच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथून तिला ससून हॉस्पिटलला हलविण्यात आले. तेथे तिने एका मुलाला जन्म दिला. तिचे वय कमी असल्याचे लक्षात येताच हॉस्पिटलकडून याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तिचा जबाब घेत फिर्याद दाखल करून घेण्यात आली.