स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकानंतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सत्तेत दिसतील - आनंदराज आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:49 IST2025-11-19T15:48:51+5:302025-11-19T15:49:29+5:30
अलीकडच्या काळात पैशाच्या जोरावर राजकारण आणि मतदान केले जाते, हे लोकशाहीला धोकादायक आहे

स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकानंतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सत्तेत दिसतील - आनंदराज आंबेडकर
पुणे: सत्तेच्या परिघाता जाण्यासाठी आणि आंबेडकर चळवळीला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आम्ही शिवसेनेच्या शिंदेगटाबरोबर युती केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका झाल्यानंतर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते सत्तेत दिसतील असे रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष ३० जागेवर निवडणुका लढविणार आहे असेही त्यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे 'रिपब्लिकन सेना क्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रीजमाेहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते.
आंनदराज आंबेडकर म्हणाले, देशात काही उघाेगपतीची संपत्ती मोठया झपाटयाने वाढत आहे. मात्र तरूणाईला रोजगार मिळत नाही. अलीकडच्या काळात पैशाच्या जोरावर राजकारण आणि मतदान केले जात आहे. हे लोकशाहीला धोकादायक आहे. स्थानिक स्वराज् संस्थेच्या निवडणुकीत ५० टक्कापेक्षा जास्त आरक्षण देणे चुकीचे आहे. राजकीय आरक्षणाचा उपयोग होत नाही. शिवसेनेच्या शिंदेगटाबरोबर आम्ही युती केली आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही १० टक्के जागा मागितल्या आहेत. पण काही जिल्हा परिषद आणि महापालिकामध्ये हे प्रमाण ५ ते १५ टक्के होईल असे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले. 'रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे अशी आता आंबेडकरी जनतेची इच्छा राहिली नाही. प्रकाश आंबडेकर आणि मी एकत्र येण्यासाठी योग्य वेळ यावी लागले. प्रगत देशामध्ये बॅलेटपेपरवर निवडणुका होतात. मग आपल्या देशातही बॅलेटपेपरवर निवडणुका घेतल्या पाहिजे. ईव्हीएमवर निवडणुका घेतल्यानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर केला पाहिजे. भीमा कोरेगाव येेथे उड्डाणपुलाचे काम लवकर केले पाहिजे असेही आंनदराज आंबेडकर यांनी सांगितले.