ओतूर : जुन्नर तालुक्यातील उत्तर भागात जुन्नर-ओतूर एसटी बससेवा नारायणगाव आगाराकडून कोरोनाकाळापासून बंद करण्यात आली आहे. ती अद्यापही बंदच आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांची ये-जा करण्याबाबत हेळसांड होत आहे. यामुळे प्रवाशांना वेळेत आपले घर गाठण्यासाठी अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. एकीकडे गावागावांत एसटी सेवा पोहोचत नाही, तर दुसरीकडे प्रवाशांना अवैध प्रवास करून अपघातात जीवाला मुकावे लागत आहे, त्यामुळे सांगा साहेब, याला जबाबदार कोण?, असा सवाल जुन्नर ते ओतूर मार्गावरील प्रवाशांमधून उपस्थित करत जुन्नर ते ओतूर मार्गावरील एसटी बससेवा परत सुरू करावी, अशी मागणी ओतूर, उदापूर, डिंगोरे, पिंपळगाव जोगा, धोलवड, कोपरे मांडवे, डुंबरवाडी, चिल्हेवाडी, मांदारणे, आंबेगव्हाण, अहिनवेवाडी, रोहोकडी उत्तर भागातील नागरिकांकडून होत आहे.
जुन्नर तालुक्यातील जुन्नर ते ओतूर ही एसटी बस कोरोनाच्या दिवसांमध्ये बंद झाली असल्याने कित्येक वर्षांपासून नोकरदार व विद्यार्थ्यांना जुन्नर - नारायणगाव-आळेफाटामार्गे ओतूर येथे ४५ ते ५० किमी अंतर कापून घरी यावे लागत आहे. त्यामुळे जुन्नर ते ओतूर हे अंतर १४ ते १६ किमी आहे. सदर बससेवा पूर्वपदावर आली नसल्यामुळे या भागातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ व इतर नागरिकांना तसेच शाळा, कॉलेज व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास करताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जुन्नर हे तालुक्याचे गाव असल्याने येथे सकाळपासून माळशेज परिसरातील विविध गावांतील नागरिकांना शासकीय काही ना काही कामानिमित्त जावे लागते. ५ नंतर एसटी बस नसल्याने या सर्वांना प्रवास करण्यास अडचणीचे होते. एसटीच्या फेरी बंद असल्यामुळे नाईलाजास्तव खासगी वाहने, नियमबाह्य, बेकायदेशीर वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सध्या काही महिन्यांपासून पुणे-नाशिक तसेच नगर-कल्याण रस्त्याला जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यामुळे जीव मिठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने सायंकाळची ६ वाजेची फेरी पूर्ववत करावे, अशी मागणी माळशेज परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
सर्वसामान्यांचे होणारे हाल थांबवा
सायंकाळी जुन्नरवरून ओतूर याठिकाणी जाण्यासाठी येथील ग्रामस्थांना एसटीचा मोठा आधार आहे. मात्र कोरोना काळापासून सदरील एसटी सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. या मार्गावरून नोकरदार, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने दररोज कामासाठी एसटीच्या माध्यमातून ये-जा करत असतात. या मार्गावर अनेक प्रवासी दररोज प्रवास करत असल्याने प्रशासनाला उत्पन्नदेखील चांगले मिळत होते. विद्यार्थीवर्गाला खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे जुन्नर-ओतूर एसटी पुन्हा एकदा सुरू करून सर्वसामान्यांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
ओतूर परिसरातून गावखेड्यातील अनेक नोकरदार प्रवाशांसह तसेच विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ये-जा करतात. या मार्गावरील ओतूरकडे जाणारी ६ वाजताची बस जाण्यास योग्य होती. प्रत्येक व्यक्ती घरी वेळेवर पोहोचत होता. बस बंद असल्याने खूप रात्र होत असून, खूप लांब पल्ल्यावरून जायला लागत असून, त्यात अपघाताचेदेखील प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विविध अडचणींचा सामना करत प्रवास करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर बस सुरू व्हावी. - राजेंद्र शेटे, सामाजिक कार्यकर्ते
सध्या गड्याची संख्या कमी आहे. बससाठी मागणी केली आहे. गाडी उपलब्ध झाली की ८ ते १५ दिवसांत जुन्नर ते ओतूर एस.टी.बस सुरळीत करण्यात येईल. - वसंत आरगडे, आगार व्यवस्थापक, नारायणगाव