हजारो मासे मरण पावल्यावर प्रशासन जागे; पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी ८ कोटींचा निधी २ वर्षांपासून पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 12:55 IST2026-04-13T12:55:03+5:302026-04-13T12:55:17+5:30

पाषाण तलावातील पाण्याची तपासणी करण्यात आली, त्यामध्ये पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे

Administration wakes up after thousands of fish die Rs 8 crore fund for conservation of stone pond languished for 2 years | हजारो मासे मरण पावल्यावर प्रशासन जागे; पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी ८ कोटींचा निधी २ वर्षांपासून पडून

हजारो मासे मरण पावल्यावर प्रशासन जागे; पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी ८ कोटींचा निधी २ वर्षांपासून पडून

पुणे: पाषाण तलावातील हजारो मासे ऑक्सिजनविना तडफडून मरण पावले. तेव्हा कुठे महापालिका प्रशासन जागे झाले आणि आयुक्तांनी चार जणांना निलंबित केले. परंतु, या पाषाण तलावाच्या संवर्धनासाठी दोन वर्षांपूर्वीच निधी आलेला आहे. तरीही प्रशासन त्यावर काहीच करत नाही. पुणे महापालिकेला १५ व्या वित्त आयोगानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत (एनडीएमए) कात्रज, पाषाण आणि जांभुळवाडी या तलावाचे संवर्धन करण्यासाठी २१ कोटी ५० लाखाचा निधी आला होता. त्यापैकी कात्रज तलावातील गाळ काढण्याचे काम पाटबंधारे विभागामार्फत पालिकेने सुरू केले. पण, पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पाषाण तलावासाठी एकही रुपयाही खर्च झालेला नाही. या तलावातील गाळ काढून तलावाचे संवर्धन झाले असते तर मासे आणि इतर जलचरांच्या मृत्यू झाला नसता.

पाषाण तलावामधील हजारो माशांचा मृत्यू झाला. त्यानंतर या तलावाला आयुक्त नवल किशोर राम यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी विविध धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. या तलावात १ एमएलडी क्षमतेचा मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) योग्यरीत्या कार्यरत नव्हता. परिणामी, प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट तलावात सोडले जात होते. याचा जलचरांवर गंभीर परिणाम झाला आणि मोठ्या संख्येने माशांचा मृत्यू झाला. १५ व्या वित्त आयोगानुसार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कात्रज , पाषाण आणि जांभुळवाडी या तलावाचे संवर्धन करण्यासाठी २१ कोटी ५० लाखाचा निधी आला होता. त्यामध्ये कात्रज, जांभुळवाडी व पाषाण या तलावामधील गाळ काढण्यात येणार होता. त्यात कात्रज तलावातील गाळ जलसंपदाच्या यांत्रिकी विभागाकडून एकदा काढण्यात आला. काढलेला गाळ तलावाशेजारीच ठेवण्यात आला होता. पण, पावसामुळे हा गाळ पुन्हा तलावात गेला. गेल्या काही महिन्यांपासून कात्रज तलावातील गाळ काढला जात आहे. पण, पाषाण तलावातील गाळ हा तलाव रिकामा न झाल्यामुळे काढता येत नाही असे उत्तर प्रशासनाच्या वतीने दिले जाते. पण, या तलावात रोज १५ एमएलडी सांडपाणी येते. त्यामुळे पाषाण तलावात पाणी राहणारच आहे. पालिका प्रशासनाने या सर्वांचा विचार करून या तलावातील गाळ काढण्याचे नियोजन करणे आवश्यक होते. पण, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

जलपर्णी काढण्यावर ३ कोटी २७ लाख खर्च, तरीही जलपर्णी जैसे थे

पाषाण तलावातील जलपर्णी काढण्यासाठी पुणे महापालिका पर्यावरण विभागाने आतापर्यंत ३ कोटी २७ लाख खर्च करण्यात आले आहे. यंदाही जलपर्णी काढण्यासाठी १ कोटी खर्चाचे नियोजन आहे. मात्र, प्रत्यक्षात तलाव पूर्णपणे जलपर्णीने व्यापलेला आहे. त्यामुळे जलपर्णी खरोखर काढली जाते का? काम न करता बिले काढली जातात? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सल्लागाराला बजावली नोटीस

पाषाण तलावातील मृत माशाप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पाषाण तलावासाठी ज्या सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे, त्या सल्लागाराला पालिका प्रशासनाने नोटीस बजावली आहे. नोटीसला उत्तर काय येते, त्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.

पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी

पाषाण तलावातील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या तलावात जलपर्णी असल्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

पाषाण तलावातील माशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर चौकशी करणार आहेत. पाषाण तलावाच्या घटनेशी संबंधित सर्व दोषींवर कारवाई केली जाईल.- नवल किशोर राम, आयुक्त पुणे महापालिका

 

 

Web Title : मछली की मौत के बाद प्रशासन जागा; झील के लिए फंड बेकार।

Web Summary : ऑक्सीजन की कमी से पाषाण झील में हजारों मछलियाँ मरीं। संरक्षण के लिए आवंटित धन खर्च नहीं हुआ, जिससे लापरवाही और प्रदूषण हुआ। जाँच के आदेश।

Web Title : Negligence awakens administration after fish deaths; funds unused for lake.

Web Summary : Thousands of fish died in Pashan Lake due to lack of oxygen. Funds allocated for conservation remain unspent, leading to negligence and pollution. Inquiry ordered.