सोशल मीडियावर गुंडांचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर होणार कारवाई
By नितीश गोवंडे | Updated: December 27, 2024 18:53 IST2024-12-27T18:52:30+5:302024-12-27T18:53:18+5:30
सोशल मीडियावरील रिल्सवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे लक्ष

सोशल मीडियावर गुंडांचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर होणार कारवाई
पुणे : सोशल मीडियावर शहरातील गुंडांचे रिल्स व्हायरल करत गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने दंड थोपटले आहेत. पोलिसांकडून अशा आरोपींना बोलवून घेत त्यांची खरडपट्टी काढण्यास सुरूवात केली आहे. सराईत गुन्हेगारांसह त्यांच्या नावाने हातात शस्त्रास्त्रे घेणे, भाईगिरीचे ऑडिओ-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणारे आता गोत्यात आले आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने सोशल मीडियावरील गँगस्टर प्रेरित रायझिंग गँगला फैलावर घेतले आहे.
गुंड गजानन मारणे याच्या नावाने सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करत दबंगगिरी करणाऱ्या दोघांना खंडणी विरोधी पथक-१ ने चांगलाच दणका दिला. त्यांना बोलावून घेत विविध सोशल मीडिया अकाैंटवरील ५० रिल्स डिलीट करण्यात आल्या तसेच पुन्हा असे करणार नसल्याची हमी त्यांच्याकडून घेण्यात आली. सूरज काकडे आणि सोमनाथ ऊर्फ पप्पू रामचंद्र मोरे (दोघे रा. हांडेवाडी) अशी दबंगगिरी करणाऱ्यांची नावे आहेत. सोशल मीडियावर दहशतीचे किंवा गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे रिल्स खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. दरम्यान, शस्त्रास्त्रांचा वापर करून व्हिडिओ करणे, सराईत गुंडांसह टोळी प्रमुखांना आदर्श मानत सोशल मीडियावर दबंगगिरी करणाऱ्यांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.
गुंडांसह त्यांच्या चाहत्यांकडून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे उघडकीस आले आहे. प्रामुख्याने व्हिडिओद्वारे फिल्मी स्टाईल दमदाटी करणे, नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे अशा पद्धतीने गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्यांचा शोध घेण्यास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुरूवात केली आहे.
सोशल मीडियाद्वारे शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणे, गुंडगिरीला प्रेरित होऊन त्यांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. शहरातील सर्व सराईत टोळ्यांच्या सोशल मीडिया हालचालींवरही आमच्याकडून बारीक लक्ष ठेवले जात आहे. - अमितेश कुमार, पोलिस आयुक्त