बनावट मृत्यू दाखल प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई, मात्र अधिकाऱ्याला अभय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:48 IST2025-02-20T14:48:24+5:302025-02-20T14:48:39+5:30
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर

बनावट मृत्यू दाखल प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई, मात्र अधिकाऱ्याला अभय
पुणे :पुणे महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याप्रकरणी कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई नाही. त्याला अभय देऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे.
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिसांनी महापालिकेच्या कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल रमेश निगडे व शुभम संजय पासलकर यांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणी मृत्यूच्या खोट्या नोंदणी केल्याने महापालिकेचे संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात यावे, असे पत्र महापालिकेस पाठविले आहे.
कुंभार म्हणाले, जन्म-मृत्यू दाखल्यावर सही करण्याचे अधिकार हे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला आहेत. सरकारी काम असलेल्या प्रत्येक कामाची, तसेच त्याचे निरीक्षण करण्याची जबाबदारी ही संबंधित अधिकाऱ्याचीच असते. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेत कंत्राटी कर्मचाऱ्यांवर दोषारोप ठेवणे कायदेशीरदृष्ट्या सहज शक्य होणार नाही. त्यामुळे संबंधित कटात सहभागी असलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी असल्याचे कुंभार यांनी केली.