नवले पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर नियम मोडणाऱ्या ८२४ वाहनचालकांवर कारवाई, २४ लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 20:54 IST2025-12-10T20:53:44+5:302025-12-10T20:54:40+5:30
आरटीओच्या वायुवेग पथकांद्वारे ही मोहीम राबविण्यात आली असून, एक पथक खेडशिवापूर टोल नाक्यावर जड वाहनांची काटेकोर तपासणी करत आहे

नवले पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर नियम मोडणाऱ्या ८२४ वाहनचालकांवर कारवाई, २४ लाखांचा दंड वसूल
पुणे: नवले पूल परिसरात गेल्या महिन्यात भीषण अपघात झाला होता. दरम्यान, चौकशीत वाहनाचा अतिवेग, वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे अपघात झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) एक पथक वाढवून सुरक्षा यंत्रणा वाढविली आहे. खेडशिवापूर टोल नाका ते नवले पूलदरम्यान गेल्या पंधरा दिवसांत वाहतूक नियम मोडणाऱ्या तब्बल ८२४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून २४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आरटीओच्या वायुवेग पथकांद्वारे ही मोहीम राबविण्यात आली असून, एक पथक खेडशिवापूर टोल नाक्यावर जड वाहनांची काटेकोर तपासणी करत आहे. तर दुसरे पथक महामार्गावर सतत गस्त घालून नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करत आहे. हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वैध विमा, वाहनाची फिटनेस, ब्रेक-लाईट व इतर दिव्यांची स्थिती, वेगमर्यादा पाळणे, तसेच मोबाइलवर बोलत वाहन चालविणे या सर्व गंभीर उल्लंघनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, अनेक वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात नियमभंग आढळून आले. यामध्ये हेल्मेट न वापरणे (८५), सीट बेल्ट न वापरणे (२६), चुकीचे पार्किंग (११३), विमा कालबाह्य असताना वाहन चालविणे (९५), मोबाइलवर बोलणे (४७), ब्रेक लाईट व दिव्यांचा बिघाड (४७), तसेच फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण न करता वाहन चालविणारे (८९) यांचा समावेश आहे.
वाहन जप्तही होणार
वाहनांमध्ये अनधिकृत फेरबदल करणे, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे, ट्रिपल सीट प्रवास, फॅन्सी नंबर प्लेट, काळ्या काचा, ध्वनी प्रदूषण, जादा प्रवासी घेणे, अवैध पार्किंग, दिशादर्शक बिघाड अशा नियमभंगांवरही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये वाहनचालकांना तत्काळ दंड आकारण्यात आला असून, काही वाहनांवर जप्तीची कारवाईही करण्यात आली आहे.
नवले पूल परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे. वाहनचालकांच्या बेफिकिरीमुळे निरपराधांचे प्राण जात असल्याने पुढील काळातही मोहीम अधिक कडकपणे राबविण्यात येणार आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. - स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे