मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एसटीचे ७ कर्मचारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 11:52 IST2025-10-31T11:52:07+5:302025-10-31T11:52:31+5:30
दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात, त्यांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरणाऱ्या वर्तनाविरुद्ध एसटी प्रशासनाने कठोर पावित्रा घेतला आहे

मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; एसटीचे ७ कर्मचारी निलंबित
पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) राज्यभर अचानक मद्यपान तपासणी मोहीम राबवून कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत काम करणाऱ्या सात कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दोषी आढळलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये चालक, वाहक आणि यांत्रिक कर्मचारी यांचा समावेश असून, सर्वांना निलंबित करण्यात आले आहे.
दररोज लाखो प्रवासी एसटीने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षिततेला धोकादायक ठरणाऱ्या वर्तनाविरुद्ध एसटी प्रशासनाने कठोर पावित्रा घेतला आहे. प्राप्त तक्रारींनंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरक्षा व दक्षता खात्याला राज्यभरातील सर्व विभागांत अचानक तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २८ ऑक्टोबर रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता राबविलेल्या या मोहिमेत १ हजार ७०१ कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात ७१९ चालक, ५२४ वाहक आणि ४५८ यांत्रिक कर्मचारी होते. तपासणीत ७ कर्मचारी मद्यपान केलेले आढळले. त्यात १ चालक, ४ यांत्रिक कर्मचारी, १ वाहक आणि १ स्वच्छकाचा समावेश आहे. धुळे विभागात एक चालक, एक यांत्रिक कर्मचारी आणि एक स्वच्छक; नाशिक विभागात एक चालक; परभणी व भंडारा विभागांत प्रत्येकी एक यांत्रिक कर्मचारी; तर नांदेड विभागात एक वाहक दोषी आढळला. या सातही कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, पुढील शिस्तभंगविषयक कारवाई सुरू आहे.
...नवीन एसटी बसमध्ये ‘ब्रेथ ॲनालायझर’ बसविणार
प्रवाशांची सुरक्षा ही एसटी महामंडळाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भविष्यात नवीन येणाऱ्या सर्व एसटी बसमध्ये चालकाच्या समोर ब्रेथ ॲनालिसिस यंत्र बसविण्यात येईल. त्यामुळे मद्यपी चालकांना तत्काळ ओळखणे शक्य होईल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ होईल.
कर्तव्यावर असताना मद्यपान करणे हा गंभीर गुन्हा आहे. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांना एसटीमध्ये स्थान नाही. - प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री