दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने नांगरणी केली म्हणून खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:43 IST2025-01-21T12:43:21+5:302025-01-21T12:43:51+5:30
चुलत भावाने दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने नांगरणी केली म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालून खून केला होता

दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने नांगरणी केली म्हणून खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेप
राजगुरुनगर : चुलत भाऊ असताना दुसऱ्याच्या ट्रॅक्टरने नांगरणी केली म्हणून अंगावर ट्रॅक्टर घालून खून करणाऱ्या आरोपीला राजगुरुनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयनाथ सोपान मनसुख (वय ३८, रा. एकनाथवाडी, सावरगाव, ता. जुन्नर) असे जन्मठेप सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये घडलेल्या या घटनेत प्रकाश नामदेव मनसुख (वय ६०) यांचा मृत्यू झाला होता. आरोपी आणि मयत भावकीतले आहेत. आरोपी जयनाथ याच्याकडे ट्रॅक्टर होता. त्या ट्रॅक्टरने तो मयत यांच्या जमिनीची पण नांगरणी करीत होता. किरकोळ कारणातून त्यांच्यात वाद झाल्यावर मयत प्रकाश यांनी गावातील दुसऱ्या व्यक्तीच्या ट्रॅक्टरने नांगरणी करून घेतली. त्याचा राग अनावर होऊन आरोपीने मयत प्रकाश यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून गंभीर जखमी केले. प्रकाश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. राजगुरुनगर न्यायालयात खटला सुरू होता. मयताच्या बाजूने सहायक सरकारी अभियोक्ता व्ही. एन. देशपांडे यांनी युक्तिवाद केला. त्याचा निकाल सोमवारी (दि. २०) देण्यात आला. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पोलिस निरीक्षक युवराज मोहिते, डी. ए. देवरे, वाय. एम. पाटील यांनी घटनेचा तपास केला. पोलिस महेश भालेराव यांनी न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला.