पुण्यातील पत्की दुहेरी खून खटल्यातील आरोपींची अखेर १५ वर्षांनी निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 20:19 IST2025-12-24T20:18:38+5:302025-12-24T20:19:08+5:30
या प्रकरणामध्ये ओळख परेड ही सुमारे ५-६ महिन्यांनी झाली व गुन्ह्यातील चोरलेल्या दागिन्याची ओळख परेड देखील झाली नाही, तसेच साक्षीदाराची नजर कमजोर होती

पुण्यातील पत्की दुहेरी खून खटल्यातील आरोपींची अखेर १५ वर्षांनी निर्दोष मुक्तता
पुणे : कर्वेनगर येथील पत्की दुहेरी खून खटल्यात सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची उच्च न्यायालयाने अखेर १५ वर्षांनी निर्दोष मुक्तता केली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारती चांडक व भारती डोंगरे यांनी हा निकाल दिला.
आरोपी अंबादास श्रीपाद जाधव व सहकारी, बंटी उर्फ गौरव गौतम वडवेराव , पंड्या उर्फ पांडुरंग अतुल जाधव अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. पुण्यातील कर्वे नगर येथे घरामधे घुसून आरोपींनी स्मिता पत्की आणि सुलभा पाच्छापूरकर या दोन विवाहित महिलांना जीवे ठार मारून सोने लंपास केले होते. त्यावेळेस आरोपी सापडून येत नसल्याने गदारोळ झाला होता. या प्रकरणात आरोपींना काही महिन्यांनी अटक करण्यात आली. सरकार तर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. यात सत्र न्यायालयाने आरोपींना जन्म ठेपेची शिक्षा दिली होती. आरोपींनी निकालाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायाधीश भारती चांडक व भारती डोंगरे यांच्या खंड पीठासमोर सुनावणी पार पडली. बंटी वडवेराव तर्फे अॅड. ऋषीकेश सोपान शिंदे व अॅड. रविराज सरवदे यांनी तर अंबादास जाधव या आरोपी साठी अॅड. अनिता अग्रवाल व इतर २ आरोपी साठी अॅड. फरहाना शाह यांनी बाजू मांडली.. या मधे अॅड. शिंदे यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. या प्रकरणामध्ये ओळख परेड ही सुमारे ५-६ महिन्यांनी झाली व गुन्ह्यातील चोरलेल्या दागिन्याची ओळख परेड देखील झाली नाही. तसेच या गुन्ह्यातील महत्वाचा प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार हा बागकाम करणारे बसप्पा धोत्रे यांनी सांगितले होते की, गुन्ह्याच्या आदल्या दिवशी आरोपी बंगल्याची रेकी करत होते व त्यांनी देखील पीडित व्यक्तींची विचारणा केली. अॅड. शिंदे यांनी हा मुद्दा खोडून काढत कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की, या व्यक्तीच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्यांची नजर कमजोर आहे . मग ही व्यक्ती ६ महिन्यांनी कशी काय ओळखू शकते? दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर अखेर आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारी वकील म्हणून एस. आर नगरकर यांनी काम पाहिले.