पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू

By नितीश गोवंडे | Updated: March 1, 2025 17:15 IST2025-03-01T17:14:37+5:302025-03-01T17:15:02+5:30

दोन घटनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा तर एका घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे

Accidents in Navale Bridge, Nagar Road, Hadapsar area in Pune City; Three deaths | पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू

पुणे शहरात नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागात अपघात; तिघांचा मृत्यू

पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवले पूल, नगर रस्ता, हडपसर भागातील रामटेकडी परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. जगजीवन कोरंगा शेट्टी (७४, रा. श्री हरिकृपा, कोरग्रावाडी, जि. उडपी, कर्नाटक) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत बेबी जगजीवन शेट्टी ( ६९) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ फेब्रुवारी राेजी सकाळी सातच्या सुमारास जगजीवन शेट्टी नवले पूल परिसरातून निघाले होते. कात्रजकडे जाणऱ्या रस्त्यावर भरधाव वाहनाने शेट्टी यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेट्टी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर शेट्टी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शेट्टी यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी तपास करत आहेत.

नगर रस्त्यावर लोणीकंद परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रमेश राजेंद्र गायकवाड (४२, रा. वाडेगाव, ता. शिरुर, जि. पुणे ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत गायकवाड यांची पत्नी कविता (३७) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार रमेश हे लोणीकंद परिसरातील थेऊर रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार गायकवाड यांना धडक दिली. अपघातात गायकवाड यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करत आहेत.

एसटीच्या धडकेत पादचारी ठार

एसटीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील हडपसर भागात घडली. काळुराम नंदकुमार जाधव (५०, रा. भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एसटी बसचालक मिलिंद तुकाराम कांबळे (४२, रा. खासापुरी, परांडा, जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलिस कर्मचारी संतोष कांबळे यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव हे शुक्रवारी (दि. २८) सकाळी अकराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील रामटेकडी परिसरातून निघाले होते. त्यावेळी उड्डाणपुलावर भरधाव एसटी बसने पादचारी जाधव यांना धडक दिली. अपघातात जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक चौगुले पुढील तपास करत आहेत.

Web Title: Accidents in Navale Bridge, Nagar Road, Hadapsar area in Pune City; Three deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.