Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू
By नितीश गोवंडे | Updated: February 14, 2025 16:41 IST2025-02-14T16:40:07+5:302025-02-14T16:41:27+5:30
भरधाव टेम्पो, बस, कारच्या धडकेत ३ दुचाकीस्वारांचा मृत्यू, तर एका वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चैाक, पुुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग, तसेच नगर रस्ता परिसरात अपघाताच्या घटना घडल्या.
पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी टेम्पोचालकाविरोधात सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विजय शंकर रेळेकर (५५, रा. देवराई, स्वामी नारायण मंदिराजवळ, आंबेगाव) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत रेळेकर यांचे भाऊ गणेश (५३, रा. गुरुराज सोसायटी, पद्मावती, पुणे-सातारा रस्ता) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार विजय रेळेकर हे बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरून निघाले होते. पद्मावती परिसरातील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार रेळेकर यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पोचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक फकीर तपास करत आहेत.
सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौकात कारच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. रूपचंद सदाशिव घाेणे (८०, रा. शाहू महाविद्यालय रस्ता, पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत घाेणे यांचा मुलगा चंद्रशेखर (५०) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार रूपचंद घाेणे बुधवारी रात्री आठच्या सुमारास ना. सी. फडके चौकातून पर्वतीकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घाेणे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर पसार झालेल्या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक इस्माइल शेख तपास करत आहेत.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वडगाव उड्डाणपुलाजवळ सेवा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या खासगी बसवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीस्वार शुभम शुक्ला (३६, रा. अलंकाकृती सोसायटी, बाणेर-सूस रस्ता) यांचा मृत्यू झाला. सेवा रस्त्याच्या कडेला धोकादायक पद्धतीने बस लावून अपघातात जबाबदार ठरल्याप्रकरणी बसचालक दिगंबर बाळासाहेब शिंदे (३२, रा. अप्पापाडा, मालाड, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कर्मचारी प्रणिल मेस्त्री यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार शुक्ला हे गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून निघाले होते. वडगाव उड्डाणपुलाजवळ सेवा रस्त्यावर खासगी बस रस्त्याच्या कडेला लावण्यात आली होती. अंधारात बसवर आदळून दुचाकीस्वार शुक्ला यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.
नगर रस्त्यावर वाघोली परिसरात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विठ्ठल बालाजी जमदाडे (४६, रा. एसटी काॅलनी, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्यमूखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत जमदाडे यांची पत्नी सीमा (३२) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.