बारामतीत शिकाऊ विमानाचे चाक निखळल्याने अपघात; रेडबर्डची तिसरी घटना, जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:28 IST2025-08-09T13:28:06+5:302025-08-09T13:28:50+5:30
उद्या जर एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, भाजप पदाधिकाऱ्याचा सवाल

बारामतीत शिकाऊ विमानाचे चाक निखळल्याने अपघात; रेडबर्डची तिसरी घटना, जीवितहानी नाही
बारामती : बारामतीविमानतळावर शनिवारी (दि ९ ) सकाळी ७:४५ वाजता बारामती येथील रेड बर्ड एव्हीएशन या खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाला अपघात झाला. विवेक यादव (वय २४ वर्षे, मुंबई) हा प्रशिक्षणार्थी पायलट सदर विमान उडवत होता. नेहमीप्रमाणे प्रशिक्षणासाठी उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या पुढील टायरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन टायर वाकडे झाले आणि निखळले. रेड बर्ड चा हा गेल्या दोन वर्षातील तिसरा विमान अपघात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र या अपघातामुळे बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर विमान जर एखाद्या घरावर, शाळेवर किंवा एमआयडीसीमधील एखाद्या कंपनीवर कोसळले असते, तर मोठी दुर्घटना घडली असती आणि जीवितहानी अटळ होती.
रेड बर्ड एव्हीएशन या संस्थेविरोधात यापूर्वीही अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरी देखील यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या संस्थेला नागरिकांच्या सुरक्षेचे कोणतेही गांभीर्य नाही. हे विमान शहराच्या रहिवासी भागाजवळून, शाळांजवळून आणि औद्योगिक कंपन्यांच्या वरून उड्डाण करत असल्याने, प्रत्येक नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करण्यात यावी. संस्थेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. शहराच्या नागरी वसाहतीजवळून होणारी प्रशिक्षण उड्डाणे थांबवण्यात यावीत. बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्यात याव्यात. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. बारामतीचे नागरिक सुरक्षित नाहीत. उद्या जर एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे दिवसांपूर्वी सोलनकर यांनी केंद्रीय विमान उड्डाणं मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रेड बर्ड या संस्थेविषयी तक्रार करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे.