Pune: मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 19:41 IST2021-12-25T19:37:37+5:302021-12-25T19:41:14+5:30
चांदणी चौकात एक रुग्णवाहिका टायर बदलण्यासाठी थांबली होती...

Pune: मुंबई-बंगळूरू महामार्गावर चांदणी चौकात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
पिंपरी: भरधाव वाहनाने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तसेच तिघे जण गंभीर जखमी झाले. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर चांदणी चौक येथे शुक्रवारी (दि. २४) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. रुग्णवाहिका चालक महेश विश्वनाथ सरवडे (वय ४४, रा. कोपर खैरणे, नवी मुंबई), सीताबाई हरी चव्हाण (वय ५४, रा. तळोजा), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
तर मनोहर हरी चव्हाण (वय २६), राजा हरी चव्हाण (वय ३५), शिवाजी मारुती खडतरे (वय ३०) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. गोपाळ भीमला चव्हाण (वय ४५, रा. तळोजा एमआयडीसी, पनवेल) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आयशर गाडी चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौकात एक रुग्णवाहिका टायर बदलण्यासाठी थांबली होती. रुग्णवाहिकेचा चालक आणि क्लिनर टायर बदलत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आयशर गाडीने रुग्णवाहिकेला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातामध्ये रुग्णवाहिकेचा चालक आणि एका महिलेचा मृत्यू झाला. तर रुग्णवाहिकेचा क्लिनर आणि अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर आयशर गाडी चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला.