फरार गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 10:54 IST2025-09-30T10:54:13+5:302025-09-30T10:54:47+5:30
घायवळला पासपोर्ट अहिल्यानगर येथील अधीक्षक कार्यालयातून देण्यात आला, त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हिसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला?

फरार गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण
पुणे : खून, दरोडा, मारामारी, खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड नीलेश घायवळ हा सध्या विदेशात असून, त्याचे लोकेशन लंडन येथे आहे, असे बोलले जात असताना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तो सध्या स्वीत्झर्लंडमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकताच नीलेश घायवळसह त्याच्या टोळीवर कोथरूड पोलिसांनी मकोकाची कारवाई केली.
एका तरुणावर गोळीबार करून लगेच दहा मिनिटांत दुसऱ्या तरुणावर धारदार हत्याराने वार करून घायवळच्या टोळीतील सदस्यांनी दोन आठवड्यांपूर्वी दोन तरुणांवर वार केले होते. याप्रकरणी त्यातील काही आरोपींना अटक करताना त्यांच्यासह इतरांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्ह्याच्या अनुषंगाने नीलेश घायवळची माहिती घेतल्यानंतर तो पुण्यात व अहिल्यानगर परिसरात नसल्याचे निष्पन्न झाले होते. प्रत्यक्षात त्यांची माहिती घेतल्यानंतर त्याचे लोकशन सध्या स्वीत्झर्लंड येथे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, घायवळला देण्यात आलेला पासपोर्ट संदर्भातही पुणे पोलिसांकडून चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, त्याला पासपोर्ट अहिल्यानगर येथील अधीक्षक कार्यालयातून देण्यात आला आहे. त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हिसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत असून, पुणे पोलिसांनी याबाबतची चौकशी सुरू केली आहे. त्याने, पासपोर्ट कधी, केव्हा, कसा मिळवला त्या दृष्टीनेही पुणे पोलिस चौकशी करत असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.