प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने संपवलं जीवन; उरुळी देवाची येथील घटना
By नितीश गोवंडे | Updated: November 27, 2023 17:03 IST2023-11-27T17:00:54+5:302023-11-27T17:03:21+5:30
तरुणाने ‘तुला काय करायचे ते कर किंवा कुठे जावून मर, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ असे बोलून तिला मानसिक त्रास दिला

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने संपवलं जीवन; उरुळी देवाची येथील घटना
पुणे: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला तिच्या घरातून पळवून नेले. यानंतर तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले, मात्र नंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रियकर आदित्य अशोक जाधव (रा. राजुरी, ता. पुरंदर) याच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या ५२ वर्षीय वडिलांनी रविवारी (२६ नोव्हेंबर) लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आदित्य जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी साडे अकराच्या सुमारास उरुळी देवाची येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी आदित्य जाधव हे एकाच गावातील रहिवासी आहेत. आरोपी आदित्य याने फिर्यादी यांच्या १९ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला घरातून पळवून नेले. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर पीडित मुलीने आदित्यकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच ‘तुला काय करायचे ते कर किंवा कुठे जावून मर, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ असे बोलून तिला मानसिक त्रास दिला. यामुळे फिर्यादी यांच्या मुलीला नैराश्य आले. दरम्यान, मुलगी उरुळी देवाची येथे मामाच्या घरी आली. तिने नैराश्यातून मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे करत आहेत.