पुणे: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी परिसरात घडली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी ट्रकचालक राहुल भीमराव तांदळे (वय ३० , रा. पनवेल, नवी मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. श्रेयस सचिन पाटील (वय २०) असे अपघातामध्येमृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर कृश विशाल पारख (वय २०, रा. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलाॅजी, माटुंगा, मुंबई) असे जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पारख याने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कृश आणि त्याचा मित्र श्रेयस हे सोमवारी (दि. २८ जुलै) दुपारी दीडच्या सुमारास मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागातून निघाले होते. त्यावेळी वाकडेवाडीतील एसटी स्थानकासमोर त्यांच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान श्रेयसचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार कृश हा जखमी झाला. सहायक पोलिस निरीक्षक भोसले तपास करत आहेत.