डेमो रेल्वेतून उतरताना युवकाचा भीषण अपघात; दोन्ही पाय चिरडले, मदतीला रेल्वे यंत्रणा अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:07 IST2025-12-30T10:07:34+5:302025-12-30T10:07:49+5:30
विशेष म्हणजे, नीरा रेल्वे स्टेशनमधील पोलीस मदत केंद्राला कुलूप लागलेले असल्याचेही समोर आले असून ‘सुरक्षा कुणासाठी?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डेमो रेल्वेतून उतरताना युवकाचा भीषण अपघात; दोन्ही पाय चिरडले, मदतीला रेल्वे यंत्रणा अपयशी
नीरा : रेल्वेअपघातानंतर जखमीला वाचवणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना नीरा रेल्वे स्टेशनवर मात्र माणुसकीच थांबली असल्याचे धक्कादायक चित्र सोमवारी (दि.२९) रात्री पाहायला मिळाले. पुणे–सातारा डेमो रेल्वेतून उतरत असताना एका १८ वर्षीय युवकाचा भीषण अपघात झाला. मात्र, या दुर्घटनेनंतर रेल्वे पोलिस, आरपीएफ आणि स्टेशन कर्मचाऱ्यांनी मदतीचा साधा हातही पुढे न केल्याचा गंभीर आरोप होत आहे. सोमवारी संध्याकाळी नीरा रेल्वे स्टेशनमध्ये पुणे–सातारा डेमो रेल्वे थांबली असताना उतरताना आदित्य साहेबराव होळकर (वय १८), रा. सोमेश्वरनगर, ता. बारामती हा युवक रेल्वेखाली गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या भीषण अपघातात त्याचे दोन्ही पाय चिरडले गेले असून तो गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर काही क्षणातच स्टेशन परिसरात गोंधळ उडाला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेले रेल्वे पोलिस, आरपीएफ व नीरा रेल्वे स्टाफ यांनी कोणतीही तत्काळ मदत न केल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, नीरा रेल्वे स्टेशनमधील पोलीस मदत केंद्राला कुलूप लागलेले असल्याचेही समोर आले असून ‘सुरक्षा कुणासाठी?’ असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेनंतर स्थानिक युवकांनी जखमी आदित्य होळकर याला मदतीसाठी धाव घेतली. प्रहार संघटनेच्या रुग्णवाहिकेतून त्याला तातडीने उपचारासाठी प्रथम लोणंद, त्यानंतर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. सध्या पुढील उपचारासाठी पुण्यातील संचेती रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, इतका गंभीर अपघात घडूनही रेल्वे प्रशासनाची उदासीनता आणि निष्क्रियता संतापजनक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असलेली यंत्रणा अपघाताच्या वेळीच गायब होत असेल, तर तिचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेची वरिष्ठ कार्यालयांनी तातडीने गंभीर दखल घ्यावी, दोषी अधिकाऱ्यांवर ठोस आणि कडक कारवाई करावी, तसेच नीरा रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व आपत्कालीन मदत व्यवस्थेचा आढावा घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.