तरुणाला व्हॉटसअप स्टेटसवर औरंगजेबचा स्टेटस ठेवणे पडले महागात; इंदापूरात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:46 IST2025-03-04T13:40:47+5:302025-03-04T13:46:10+5:30
वफत ए हजरत औरंगजेब आलमगीर आर.ए.' असा मजकूर असलेला स्टेटस आपल्या व्हॉटस अपवर ठेवला होता

तरुणाला व्हॉटसअप स्टेटसवर औरंगजेबचा स्टेटस ठेवणे पडले महागात; इंदापूरात गुन्हा दाखल
इंदापूर -व्हॉटस अपच्या स्टेटसवर औरंगजेब याचा फोटो व मजकूर ठेवल्याच्या आरोपावरुन इंदापूर पोलीसांनी एक जणावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे.अक्रम रशीद कुरेशी (रा.कुरेशीगल्ली,इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. भाजपचे शहराध्यक्ष किरण गानबोटे ( रा.अंबिकानगर, इंदापूर) यांनी या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की,आरोपी अक्रम कुरेशी याने दि.२ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास औरंगजेब याचा फोटो व त्याखाली ३ मार्च वफत ए हजरत औरंगजेब आलमगीर आर.ए.' असा मजकूर असलेला स्टेटस आपल्या व्हॉटस अपवर ठेवला होता. दि.३ मार्चला सकाळी व्हॉटसअपवरचे स्टेटस बघत असताना फिर्यादी किरण गानबोटे यांच्या नजरेस ही बाब आली.
तो फोटो व मजकूर बघितल्यानंतर समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जातील याची जाणीव असताना व भारत देशात औरगंजेब याचे कोणते ही चांगले कार्य नसताना,त्याचे उदात्तीकरण व्हावे या उद्देशाने आरोपीने हे स्टेटस ठेवले आहे.ते पाहून हिंदु समाजाच्या भावना दुखावून हिंदू मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल म्हणून, सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे हेतूने व्हॉटसअप स्टेटसला वरील पोस्ट प्रसारित केल्याच्या कारणावरुन गानबोटे यांनी आरोपीविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरात गुन्हे शोध पथकाचे प्रमुख हवालदार प्रकाश माने, हवालदार सलमान खान यांनी आरोपीस ताब्यात घेतले.
दरम्यान, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी शहरातील दर्गा मस्जिदी, व देवळांच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. फौजदार दत्तात्रय लेंडवे अधिक तपास करत आहेत.