आळंदीत देवदर्शनसाठी निघताना काळाचा घाला; पादचारी महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:53 IST2025-12-04T11:52:53+5:302025-12-04T11:53:07+5:30
महिलेला पीएमपी थांब्यासमोर भरधाव दुचाकीने धडक दिली, अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला

आळंदीत देवदर्शनसाठी निघताना काळाचा घाला; पादचारी महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू
पुणे : विश्रांतवाडी परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रेश्मा रामचंद्र भोसले (६३, रा. हरेकृष्ण सोसायटी, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार पवन आजिनाथ मांडगे (२५, रा. भारतमातानगर, आळंदी रस्ता, दिघी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूरज रामचंद्र भोसले (२९) याने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा भोसले विश्रांतवाडी भागात राहायला आहेत. १ डिसेंबर रोजी त्या सायंकाळी आळंदी येथे दर्शनासाठी निघाल्या होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास विश्रांतवाडीतील म्हस्के वस्तीजवळ असलेल्या पीएमपी थांब्यासमोर भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.