तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद...
By भाग्यश्री गिलडा | Updated: November 10, 2023 18:48 IST2023-11-10T18:47:54+5:302023-11-10T18:48:29+5:30
नग्न अवस्थेतील नाचतानाचा व्हिडिओ गावातील व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप येरवडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने केला

तरूणाला नग्न करून नाचायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल; पोलिस म्हणतात फिर्यादीच संशयास्पद...
पुणे: तरूणाला फ्लॅटवर बोलावून घेत टोळक्याने त्याला नग्न करत नाचायला भाग पाडल्याची तक्रार येरवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तसेच फिर्यदिकडील ६० हजार रूपये जबरदस्तीने घेउन लुट केल्याची फिर्यादीत नोंद केली आहे. नग्न अवस्थेतील नाचतानाचा व्हिडिओ गावातील व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप येरवडा परिसरात राहणाऱ्या तरुणाने केला आहे. हा प्रकार १३ ते १४ जुलै दरम्यान घडला आहे. सोमनाथ कोंडींबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले (सर्व रा. तिसगाव प्रवरानगर) यांच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच गावचे असून मित्र आहेत. आरोपींनी १३ जुलैला फोन करून तुझा भाउ आला आहे, असे सांगून एकतानगरमधील फ्लॅटमध्ये फिर्यादीला बोलावले. त्याठिकाणी फिर्यादीला कपडे काढून नग्न होउन नाचायला भाग पाडले. त्यानंतर त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडील ६० हजारांची रोकड काढून घेतली. त्याशिवाय त्याचा मोबाइल जाळून टाकला. तरूणाचा व्हिडिओ गावाकडील व्हॉटसअॅप ग्रुपवर व्हायरल केला. याप्रकरणी फिर्यादी तरूणाने उशिरा तक्रार दिल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीची भूमिका संशयास्पद
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फिर्यादी हा एका बँकेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. लोन काढून देण्यासाठी पैश्यांची मागणी करतो. मात्र पैसे घेतल्यावर लोन काढून देत नाही त्यामुळे त्याच्यात आणि लोन घेणाऱ्यांमध्ये भांडण होतात. काही दिवसांपूर्वी बंद गार्डन पोलीस ठाण्यात फिर्यादीने अशीच एक तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादीच संशयास्पद असल्याचा पोलिसांना संशय आहे.