'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:53 IST2025-07-25T12:50:47+5:302025-07-25T12:53:54+5:30

छावाचे काही कार्यकर्ते अजित दादांनाही शिव्या देत होते, म्हणून तो सगळा पुढचा प्रकार झाला

A small mistake by the chhava people but a big mistake by our ncp workers chhagan bhujbal reaction on the vijay Ghadge beating cas | 'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया

'थोडी चूक छावाच्या लोकांची तर मोठी चूक आमच्या लोकांची', घाडगे मारहाण प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया

पुणे: लातूर येथे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण कडून मारहाण झालेले विजय घाडगे आज पुण्यात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या वादावर सूरज चव्हाण यांनी जाहीर माफी मागत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकरणावर छगन भुजबळ यांनी पुण्यात भाष्य केलं आहे. 

भुजबळ म्हणाले, हा वाद आता मिटलाच पाहिजे. थोडी चूक छावाच्या काही लोकांकडून झाली. आणि मोठी चूक आमच्या लोकांकडून झाली आहे. छावाचे काही कार्यकर्ते अजित दादांनाही शिव्या देत होते. म्हणून तो सगळा पुढचा प्रकार झाला. क्रोध कंट्रोल करता आला पाहिजे. सभ्य भाषेत विचारलं गेलं पाहिजे. अजित दादा घाडगे यांना भेटत असेल तर चांगली गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

काय आहे प्रकरण?

छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या २-३ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले. रविवारी रात्री उशिरा औसा रोडवर छावाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी अजित पवारांचे बॅनर फाडून जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी गस्त घातली. कुणीही कायदा हातात घेऊ नये यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. 

सुरज चव्हाण यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मागितली होती माफी 

महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी सांगितले. 

Web Title: A small mistake by the chhava people but a big mistake by our ncp workers chhagan bhujbal reaction on the vijay Ghadge beating cas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.