दुर्मिळ योगायोगच म्हणावं लागेल! धनकवडीतील बापलेक अन् मुलानं पटकावलं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:59 IST2024-12-18T14:58:56+5:302024-12-18T14:59:33+5:30
विठ्ठल कडू यांनी ९ महिन्यात १० पदके मिळवली असून मुलगा व मुलीने शालेय, जिल्ह्यास्तरीय, राज्यस्तरीय व नॅशनल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे

दुर्मिळ योगायोगच म्हणावं लागेल! धनकवडीतील बापलेक अन् मुलानं पटकावलं सुवर्णपदक
धनकवडी: एकदा नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत मुलगा, मुलगी आणि वडील तिघांनाही एकाच वेळी सुवर्णपदक पटकावलं असं म्हटलं तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही, परंतु धनकवडीतील चव्हाणनगर येथील सिद्धेश विठ्ठल कडू, वय १४ वर्ष, नारायणी विठ्ठल कडू, वय १० वर्ष व विठ्ठल कृष्णा कडू वय ४५ वर्षे या तिघांनी (मुलगा मुलगी आणि वडील) नवी मुंबई चॅम्पियन सर्व्हिस फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लर्निंग फाउंडेशन नवराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने २० व्या राष्ट्रीय योगासना स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत मुलाने सिल्व्हर, तर बापलेकीने सुवर्णपदक पटकावलं आहे. हा योगायोगमधील दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल. प्रमुख अतिथी लायन संजीव सूर्यवंशी आर्ट ऑफ लर्निंग फाउंडेशन संस्थापक डॉ. रिना अग्रवाल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला.
धनकवडीतील संभाजीनगरमध्ये राहणारे विठ्ठल कडू ह.भ.प. आणि योगगुरू म्हणून परिचित आहेत. तसेच ते शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठान व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत, तर त्याचबरोबर योगाचे प्रशिक्षणदेखील घेतात,
विठ्ठल कडू ९ महिन्यांत १० पदक
एप्रिल २०२४ ते १५ डिसेंबर २०२४ आत्तापर्यंत एकूण चार राष्ट्रीय (नॅशनल) गोल्ड मेडल, चार राज्यस्तरीय (स्टेट लेवल) गोल्ड मेडल आणि जिल्हास्तरीय दोन अशी एकूण नऊ सुवर्णपदक आणि एक सिल्वर मेडल अशी दहा पदक पटकावली असून, झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तर मुलगा सिद्धेश व मुलगी नारायणी यांनी ही अनेक शालेय, जिल्ह्यास्तरीय, राज्यस्तरीय व नॅशनल स्पर्धेत पदकांची लयलूट केली आहे. दोघंही मुलं लहानपणापासून योगाचे अतिशय अवघड आसनं अगदी सहजतेने करतात.
नुकत्याच नवी मुंबई चॅम्पियन सर्व्हिस फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित राष्ट्रीय योगासन स्पर्धेत नारायणी विठ्ठल कडू प्रथम पारितोषिक सुवर्णपदक, विठ्ठल कृष्णा कडू सुवर्णपदक, सिद्धेश विठ्ठल कडू द्वितीय पारितोषिक, सिल्वर पदक मिळाले असून, त्यांच्या टीममधील शंकर आवाळे, सिल्व्हर, वसुधा जोशी सिल्वर पदक, स्वाती अंदुरे ब्रांझ पदक मिळाले आहे. या सर्वांना विठ्ठल कडू यांचे मार्गदर्शन लाभले.