घरात शिरलेल्या हल्लेखोराशी झटपट; गळ्यावर चाकूने वार, दाबेली विक्रेत्या तरुणाचा विनाकारण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:16 IST2025-07-21T16:15:26+5:302025-07-21T16:16:16+5:30
हल्लेखोर हा उलटसुलट उत्तरे देत असल्याने मानसिक रुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे

घरात शिरलेल्या हल्लेखोराशी झटपट; गळ्यावर चाकूने वार, दाबेली विक्रेत्या तरुणाचा विनाकारण खून
पुणे : उघड्या घराच्या दरवाजातून घरात शिरलेल्या हल्लेखोराने एका तरुणावर चाकूने वार केला. यात तरुणाचा मृत्यू झाला. स्वारगेट येथील पर्वती दर्शन वसाहतीत हा प्रकार सोमवारी (दि. २१) सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडला. पोलिसांनी सातारा रोडवरून हल्लेखोराला ताब्यात घेत अटक केली. दानिश सिद्दीकी (२५, रा. पर्वती दर्शन) असे खून झालेल्या दाबेली व्यावसायिक तरुणाचे नाव आहे. तर दिनेश प्रभाकर क्षीरसागर (३५, रा. यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दानिश सिद्दीकी हा त्याचा भाऊ व भावजयेसह सहा महिन्यांपासून राहत आहे. दानिशचा दाबेलीचा व्यवसाय आहे. पर्वती दर्शन वसाहतीत चिंचोळ्या गल्ल्या आहेत. यंग सर्कल जवळ दानिशचे घर आहे. सोमवारी सकाळी पावणे नऊच्या दानिशच्या घराचा दरवाजा उघडा होता. हल्लेखोर दिनेश त्याच्या घरात शिरला. हे पाहून दानिशने त्याला पकडले. दोघांमध्ये झटापट झाली. त्यात हल्लेखोराने चाकूने दानिशच्या गळ्यावर वार केला. त्यामुळे दानिश याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार पाहून लोकांनी पाठलाग करत हल्लेखोराला सातारा रोडवरून पकडले. पोलिसांना याची माहिती मिळताच पर्वती पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हल्लेखाराला ताब्यात घेतले. हल्लेखोर हा मानसिक रुग्ण असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. दानिशला का मारले, याविषयी तो उलटसुलट उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पर्वती पोलिस पुढील तपास करत आहे.