हिरा सरवदे
पुणे: नदी काठ सुशोभीकरणांतर्गत महापालिकेने आरटीओ कार्यालयाजवळील संगम पूल ते बंडगार्डन पूल या दरम्यान नदी काठावरून नवीन रस्ता करण्याचे नियोजन केले आहे. नदी सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत बंड गार्डन ते मुंढवा यादरम्यान रस्त्याचे काम केले जात आहे. नियोजित रस्ता झाल्यानंतर वाहनचालकांना संगम पुलापासून मुंढव्यापर्यंत विना अडथळा जाता येणार आहे.
गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदी काठचे ४४ कि.मी लांबीचे सुशोभीकरण करण्याचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. यासाठी ४ हजार ७२७ कोटी रुपये खर्च येणार आहे. प्रकल्पाचे काम ११ टप्प्यांत करण्यात येणार असून, त्यापैकी तीन टप्प्यांचे काम प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत आहे. एका टप्प्यासाठी येणारा ७०० कोटी रुपये खर्च महापालिकेच्या निधीतून करण्याचा व उर्वरित खर्च पीपीपी तत्त्वावर करण्यात येणार आहे.
प्रकल्पातील टप्पा क्र. ९ मध्ये संगमवाडी ते बंडगार्डन या ३.७ किलोमीटर लांबीचे नदी सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, तर टप्पा क्र. १० व ११ बंडगार्डन ते मुंढवा यादरम्यानचे ५.३ किलोमीटरचे काम पीपीपी तत्त्वावर केले जात आहे. यामध्ये कोरेगाव पार्कच्या बाजूने बंडगार्डन ते मुढवा यादरम्यान ३० मीटर रुंदीचा रस्ता केला जात आहे.
दरम्यान, दिवसेंदिवस वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या पाश्वभूमीवर बंडगार्डन ते मुंढवा यादरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या धर्तीवर संगम पूल ते बंडगार्डन यादरम्यानही ताडीवाला रोड झोपडपट्टी, आरटीओच्या बाजूने नदी काठावरून नवीन रस्ता करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. हा रस्ता बंडगार्डन पूल येथे भुयारी मार्गाने मुंढव्याकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडला जाणार आहे. यामुळे वाहनचालकांना संगम पुलापासून मुंढव्यापर्यंत विना अडथळा प्रवास करता येणार आहे. नियोजित नवीन रस्ता नदी सुशोभीकरणालगत असल्याने या रस्त्याचा वापर नदीकाठी फिरण्यासाठी जाणाऱ्यांनाही करता येणार आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाही करण्याचे नियोजन असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शिवणे-खराडी रस्त्याचे तीन तेरा, तुकड्या-तुकड्याच्या कामासाठी कोट्यवधींचा चुराडा
वाहनचालकांना शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत विना अडथळा जाता यावे, वाहतूककोंडीतून दिलासा मिळावा, यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी शिवणे-खराडी या नदी पात्रालगतच्या रस्ताची घोषणा केली आणि काम हाती घेतले. हा संपूर्ण प्रकल्प ३६३.४ कोटींचा असताना तुकड्या तुकड्याच्या कामासाठी आजवर ३०० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे. असे असूनही हा रस्ता भूसंपादनामुळे जागोजागी रखडलेला आहे. त्यामुळे शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत वाहतूक कोंडीचा सामना न करता पोहचल्याचे वाहनचालकांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. संगम पूल ते बंडगार्डन आणि बंड गार्डन ते मुंढवा यादरम्यानचे दोन्ही रस्ते पूर्ण झाल्यानंतर वाहन चालकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.