भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 19:02 IST2025-09-07T18:53:48+5:302025-09-07T19:02:07+5:30

Shreemant Bhausaheb Rangari Ganapati 2025: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची मिरवणूक ठरली लक्षवेधक!

A grand procession bids farewell to the rich Bhausaheb Rangari Ganapati with a lavish procession and a shower of flowers! | भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!

भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!

पुणे : रत्नजडीत रथाला पुष्पांची आकर्षक सजावट, त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, भंडाऱ्याची उधळण, ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्ठी आणि ढोल ताशांचा गजरात व मोरया मोरया जयघोषात दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर बाप्पाच्या दर्शनासाठी उपस्थित होते.

अनंत चतुर्दशीला शनिवारी सकाळी साडेसात वाजता पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा व आरती झाली. त्यानंतर सकाळी आठ वाजता रत्न महालातून बाप्पा विराजमान झालेला 'श्री गणेशरत्न रथ' विसर्जन मिरवणुकीसाठी मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. टिळक पुतळा येथे प्रथा परंपरेनुसार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते मानाच्या पाचही गणपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

त्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी  'श्री गणेशरत्न रथाचे सारथ्य केले. रात्री अकरा वाजता बेलबाग चौकात रंगारी बाप्पाच्या रथाचे आगमन झाले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा पुतळा आणि त्यावर नगारा मिरवणुकीत पुढे होते. त्यापाठोपाठ श्रीराम आणि रमणबाग यांच्या यांच्या ढोल पथकांच्या वादनाने मिरवणुकीचा उत्साह वाढवला. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांकडून भंडाऱ्याची उधळण आणि पुष्पवृष्टी केली जात होती, तर रथावर कोल्ड फायरची होणारी विद्युत आतषबाजी त्यामुळे ही मिरवणूक भक्तांच्या डोळांचे पारणे फेडणारी अशीच ठरली. 

पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ‘श्री गणेशरत्न रथ' टिळक चौकात आल्यानंतर सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा व उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पांची आरती झाली आणि बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. पहाटे ३ वाजून ५० मिनिटांनी पांचाळेश्वर विसर्जन घाटावर महापालिकेच्या हौदात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे भक्ती भावाने भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.


श्री गणेश रत्नरथाची आकर्षक सजावट 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक १३४ वर्षांपासून पारंपारिक रथात केली जात होती. मात्र, गतवर्षी पासून विसर्जन मिरवणुकीसाठी दरवर्षी आकर्षक रथ तयार केला जातो. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ट्रस्टने श्री गणेशरत्न रथ' तयार केला होता. रत्नजडीत रथावर पिंक वेलवेट फुलांची करण्यात आलेली सजावट, विद्युत रोषणाई आणि त्यावरील रंगारी बाप्पाची मूर्ती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे हा रथही भाविकांचे लक्ष वेधून घेत होता, हजारो भाविकांनी त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेतली.

"श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट च्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक दरवर्षीप्रमाणे यंदाही जल्लोषात आणि उत्साहात पार पडली. पोलिस प्रशासनाने लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीसाठी प्रवेश दिल्यानंतर आम्ही सहभागी झालो. आमच्या मंडळासाठी जो मिरवणुकीचा कालावधी निश्चित केला होता, त्यापेक्षा कमी कालावधीत विसर्जन मिरवणूक संपवून आम्ही पोलिस प्रशासनाला दिलेला शब्द पाळला. मात्र, आम्हाला दिलेल्या वेळेनुसार मिरवणुकीत सहभागी होता आले असते तर बाप्पाच्या दर्शनासाठी येऊन थांबलेल्या हजारो भाविकांना प्रतीक्षा करावी लागली नसती. मात्र, हा संपूर्ण गणेश उत्सव उत्साहात आणि शांततेने पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, महापालिका, मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांनी केलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार!
- पुनीत बालन, विश्वस्त आणि उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट

Web Title: A grand procession bids farewell to the rich Bhausaheb Rangari Ganapati with a lavish procession and a shower of flowers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.