माझा एक सीआरपीएफ अधिकारी मित्र..., असा मेसेज आल्यास सावधान; पोलिसांच्या नावाने फेक अकाउंट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 12:48 PM2023-10-04T12:48:28+5:302023-10-04T12:48:40+5:30

पोलिस अधिकाऱ्याच्या फेसबुक मेसेंजरवरून मेसेज आला तर सावधान! तत्काळ रिप्लाय देण्याची घाई करू नका

A CRPF officer friend of mine beware if you get a message like this Fake account in the name of police | माझा एक सीआरपीएफ अधिकारी मित्र..., असा मेसेज आल्यास सावधान; पोलिसांच्या नावाने फेक अकाउंट

माझा एक सीआरपीएफ अधिकारी मित्र..., असा मेसेज आल्यास सावधान; पोलिसांच्या नावाने फेक अकाउंट

googlenewsNext

नम्रता फडणीस

पुणे : माझा एक सीआरपीएफ अधिकारी मित्र आहे. त्याची बदली झाली असून, त्याला घरातील फर्निचर विकायचे आहे. फर्निचर चांगले असून, त्याची किंमतही कमी आहे, असा मेसेज कुणा एखाद्या पोलिस किंवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या फेसबुक मेसेंजरवरून आला तर सावधान! मेसेजला तत्काळ रिप्लाय देण्याची घाई करू नका. कारण इथं तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच चोरट्यांच्या रडारवर आहेत. या सायबर चोरट्यांना पोलिसांचे कोणतेच भय राहिले नाही. पोलिसांच्याच नावाची सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून पोलिसांच्या नावाने मेसेंजरवर फर्निचर विक्रीसंबंधीचे मेसेज पाठविले जात आहेत. या फेक अकाउंटमधून आयएस अधिकारीही सुटलेले नाहीत.

सध्याच्या काळात सर्वांनाच एकप्रकारे सोशल मीडियाचे व्यसन लागल्यासारखे झाले आहे. मात्र हे एक दुधारी अस्त्र आहे. सोशल मीडिया हाताळणे सोपे वाटत असले तरी त्याच्या संभाव्य धोक्यांबद्दल अनेकांना कल्पना नाही. कोणताही व्यक्ती आपल्या अकाउंटवरून फोटो, नाव किंवा इतर माहिती मिळवून सहजपणे फेक अकाउंट तयार करू शकतो. हे सायबर चोरट्यांच्या हातात फसवणुकीसाठीचे आयते कोलीत मिळाल्यासारखे झाले असून, याकरिता विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह पोलिस दलातील अधिकारी व आयएस अधिकाऱ्यांची फेक अकाउंट चोरट्यांकडून तयार केली जात आहेत.

या फेक अकाउंटवरून त्यांच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांना मेसेंजरवरून फर्निचर विक्रीसंबंधीचे मेसेज पाठविले जात आहेत. संबंधित अकाउंट पोलिस किंवा आयएस अधिकाऱ्यांचे आहे, असे समजून कुणीही व्यक्ती त्यांच्या मेसेजच्या जाळ्यात अडकू शकतो. अशा मेसेजला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन सायबर तज्ज्ञ यांनी केले आहे.

चौथे फेक अकाउंट 

मी कोणालाही फेसबुक मेसेंजरवर नंबर मागितलेला नाही. मी कोणालाही माझे फर्निचर विकत नाहीये. माझा संतोष कुमार नावाचा, विक्रम कुमार किंवा कोणत्याही नावाचा कोणीही सीआरपीएफचा सहकारी नाही. तसेच तो व्यक्ती मेसेंजरवरून तुम्हाला तुमचा नंबर मागेल. फर्निचरचे फोटो टाकेल. तरी विश्वास ठेवू नये. मी भविष्यातही फर्निचर विकणार नाही. मागील तीन महिन्यांत हे चौथे फेक अकाउंट आहे. एका अकाउंटचे दोन-तीन हजार फॉलोअर्स पण झाले आहेत. कृपया असे अकाउंट रिपोर्ट करावे. अनफ्रेंड करावे. - कौस्तुभ दिवेगावकर, आयएएस अधिकारी

अकाउंट हॅक झाल्याचे कळविले

माझे दुसऱ्यांदा फेक अकाउंट तयार करण्यात आले आहे. पहिल्या वेळी नाव लालाराम गायकवाड आणि फोटो माझा वापरण्यात आला होता. दुसऱ्या वेळी नाव माझे वापरून फाेटाे माझ्या पोलिस मित्राचा वापरला. फर्निचर विक्रीसंबंधी माझ्या फेक अकाउंटवरून अनेकांना मेसेज गेल्याने मला फोन येऊ लागले. त्यानंतर मी माझ्या मित्र मंडळींना आणि जवळच्या व्यक्तींना व्हाॅट्सॲप आणि फेसबुकवरून अकाउंट हॅक झाल्याचे कळविले; पण सायबरकडे तक्रार केलेली नाही. - संजय गायकवाड, निवृत्त पोलिस अधिकारी

फेक अकाउंट झाल्यास काय कराल?

- फेक अकाउंटच्या प्रोफाइलवर जावे. उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा आणि तेथे रिपोर्टवर क्लिक करून सबमिट करा.
- शक्यतो स्वत:चे सोशल मीडिया अकाउंट लाॅक करा.
- कोणत्याही मेसेजला तत्काळ प्रतिसाद देऊ नका.

Web Title: A CRPF officer friend of mine beware if you get a message like this Fake account in the name of police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.