अशोक काकडे
लोहगाव : पुण्यातील येरवडा येथील आशियातील सर्वांत मोठे प्रादेशिक मनोरुग्णालय पुन्हा एकदा गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. रुग्णालयाच्या उपअधीक्षकांसाठी राखीव असलेल्या शासकीय निवासस्थानात चक्क ‘चर्च’ चालवले जात असून, त्या ठिकाणी धर्मांतराचा खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराला रुग्णालयाचे अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील अधीक्षक आणि उपअधीक्षक व कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेली शासकीय निवासस्थाने सध्या रिकामी आहेत. अधीक्षक रुग्णालय परिसरात न राहता प्रतीकनगर येथे राहतात. इतर अधिकारी, कर्मचारीसुद्धा रुग्णालयाच्या आवाराबाहेर वास्तव्य करत असल्याचा फायदा घेऊन, शासकीय निवासस्थानी दर रविवारी प्रार्थना सभांच्या नावाखाली चर्च चालवले जात असल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भातील काही व्हिडीओ फुटेजही समोर आले असून, शासकीय मालमत्तेचा असा अनधिकृत वापर होत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रुग्णांच्या नातेवाइकांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न
या ठिकाणी केवळ प्रार्थना सभाच होत नसून, राज्याच्या काेनाकोपऱ्यातून आलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाइकांना हेरले जात असल्याचा आरोप आहे. “तुमचा रुग्ण बरा केला जाईल, तुमच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करू, तुम्हाला नोकरी लावून देऊ,” अशी आर्थिक आणि भावनिक आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. रुग्णांच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे बोलले जात आहे.
प्रशासकीय संगनमताचा संशय...
रुग्णालयाच्या आवारात इतक्या मोठ्या प्रमाणावर धार्मिक उपक्रम राबविले जात असताना प्रशासनाला याची माहिती नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाला अधीक्षकांची कार्यपद्धतीच जबाबदार असून त्यांच्या मूकसंमतीनेच हे सर्व सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहेत.
आरोग्य विभागाच्या भूमिकेकडे लक्ष
या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागातही खळबळ उडाली असून, आरोग्य मंत्रालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि हे अनधिकृत धर्मस्थळ तातडीने बंद करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महाराष्ट्र शासनाने येरवडा मनोरुग्णालयाच्या उपअधीक्षकांसाठी दिलेली शासकीय निवासस्थान ही अधिकारी कर्मचाऱ्यांसाठीची आहेत, अनधिकृत धार्मिक स्थळ चालवण्यासाठी नाहीत. १३८ एकर जमिनीचे पालकत्व असतानाही अधीक्षकांच्या नाकाखाली शासकीय बंगल्यात ‘चर्च’ चालवले जाते आणि तिथे धर्मांतराचे जाळे विणले जाते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. माझा कोण्या धर्माला विरोध नाही; पण शासकीय निवासस्थानात धर्मप्रसार सुरू असणे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. या सर्व प्रकरणाला अधीक्षकच जबाबदार असून, त्यांची तत्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. - शशिकांत उल्हास साटोटे (सामाजिक कार्यकर्ते)
सदर ठिकाणी प्रार्थनास्थळ चालवले जात असल्याची कुणकुण आम्हाला तीन-चार महिन्यांपूर्वी लागली होती. त्याबाबत संबंधित व्यक्तीला समजसुद्धा दिली होती. सदर व्यक्ती मनोरुग्णालयाचा कर्मचारी असून गेली १५ ते १६ वर्षे झाली तो तिथे राहत आहे. असे काही घडत असेल तर ‘शो-कॉज’ नोटीस देऊन, सदर बंगला खाली करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.” - श्रीनिवास कोलोड, प्रभारी अधीक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय
Web Summary : Yerwada Mental Hospital faces controversy: A church allegedly operates within a government residence, prompting conversion accusations. Social activists blame the superintendent for this activity, alleging exploitation of vulnerable patients' relatives with promises of help in exchange for conversion. An inquiry is demanded.
Web Summary : येरवड़ा मानसिक अस्पताल विवादों में: सरकारी आवास में चर्च चलने और धर्मांतरण के आरोप लगे हैं। सामाजिक कार्यकर्ताओं ने अधीक्षक को दोषी ठहराया, आरोप लगाया कि वे धर्मांतरण के बदले में मदद के वादे के साथ कमजोर रोगियों के रिश्तेदारों का शोषण करते हैं। जांच की मांग की गई है।