मध्यरात्री गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावरच कोयत्याने हल्ला; पुण्याच्या डेक्कन परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:12 IST2025-10-06T12:11:02+5:302025-10-06T12:12:02+5:30
या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पोलीस दलात संतापाचे वातावरण आहे

मध्यरात्री गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यावरच कोयत्याने हल्ला; पुण्याच्या डेक्कन परिसरातील घटना
पुणे: पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीतील लॉ कॉलेज समोर मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गुन्हे शाखा युनिट ३ मधील पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री ( 12:55) वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार अमोल काटकर ( नेमणूक गुन्हे शाखा युनिट ३, पुणे शहर) हे आपले कर्तव्य पूर्ण करून घरी जात होते. त्यावेळी लॉ कॉलेजसमोर दोन अज्ञात व्यक्तींनी अज्ञात कारणावरून त्यांना थांबवून काठी व धारदार हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात काटकर यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम झाली.
घटनेची माहिती डायल 112 वरून पोलिसांना प्राप्त होताच प्रभात रोड मार्शल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता जखमी इसम हा गुन्हे शाखेतील कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ त्यांना उपचारासाठी प्रथम रत्ना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोर कोण आणि हल्ल्याचे नेमके कारण काय, याबाबत पोलीस तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यावरच हल्ला झाल्याने पोलिस दलात संतापाचे वातावरण आहे.