धक्कादायक! पुणे शहरात दररोज हाेताहेत ९ महिलांवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 10:37 AM2023-05-22T10:37:04+5:302023-05-22T10:38:10+5:30

मे महिन्यातील २० दिवसांत महिलांबाबत वेगवेगळ्या १७५ घटना पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत....

9 women are molested every day in Pune city pune latest crime news marathi batmya | धक्कादायक! पुणे शहरात दररोज हाेताहेत ९ महिलांवर अत्याचार

धक्कादायक! पुणे शहरात दररोज हाेताहेत ९ महिलांवर अत्याचार

googlenewsNext

- विवेक भुसे

पुणे : महिला बेपत्ता होण्याविषयी सध्या राज्यात जोरदार राजकीय आरोप - प्रत्यारोप होत असतानाच पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिला अत्याचाराच्या दररोज सरासरी ९ घटना शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होत असून, त्याकडे मात्र सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यात प्रामुख्याने विवाहित स्त्रीला क्रूर वागणूक देणे, बलात्कार, विनयभंग आणि अपनयन, अपहरण अशा घटनांचा समावेश आहे. मे महिन्यातील २० दिवसांत महिलांबाबत वेगवेगळ्या १७५ घटना पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी महिला बेपत्ता होण्याबाबत पोलिस महासंचालकांना पत्र लिहून त्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रश्नाने राजकीय वळण घेतले. या राजकीय गदारोळात महिलांविषयक गुन्ह्यांकडे गंभीरपणे पाहिले जात नाही.

पुणे शहरात भरदिवसा महिलांची छेडछाड करणे, त्यांना जाता - येता अश्लील शिविगाळ करणे, रस्त्याने जाताना जाणीवपूर्वक धक्का मारणे, अशा घटना घडत आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक घटना होत असतात. अनेकदा तरुणी, अल्पवयीन मुली, महिला या आपली बदनामी नको, म्हणून त्या कोणाला न सांगता स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या घटना सहन करत असतात.

विवाहितेचा छळ होण्याच्या घटनांमध्ये या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत मोठी वाढ झालेली दिसून येते. माहेरहून पैसे आणावेत, यासाठी अजूनही महिलांचा छळ केला जात आहे. अनेकदा लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच विवाहितेचा छळ सुरू झाल्याचे या प्रकरणांमध्ये दिसून येते. अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. रस्त्याने जाताना तरुणींना टॉन्ट मारणे, त्यांच्याकडे पाहून अश्लील शेरेबाजी करणे, त्याच्या नको त्या ठिकाणी स्पर्श करणे असे प्रकार वाढू लागले आहेत. तसेच बसमध्ये असणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या अंगचटीला जाणे असे प्रकार होत असतात.

‘मुलगी घरातून पळाली’चे गुन्हे सर्वाधिक

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा अशा शारीरिक संबंधातून अनेक अल्पवयीन मुली गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर येतो. अपहरणामुळे प्रामुख्याने अल्पवयीन मुली घरातून पळून गेल्यानंतर दाखल झालेले गुन्हे सर्वाधिक असतात.

शरीराविरूद्धच्या गुन्ह्यांपेक्षा अधिक महिलाविषयक गुन्हे

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाकडून कायम खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी अशा घटना रोखण्याकडे प्राधान्य दिले जाते. ते महत्त्वाचेही असते. त्याचवेळी महिलांविषयक गुन्ह्यांकडे त्याच्याइतके गांभीर्याने अजून पाहिले जात नाही. या वर्षातील चार महिन्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, गर्दी - मारामारी अशा ५६८ गुन्ह्यांची नोंद शहर पोलिस दलात झाली होती. त्याचवेळी महिलांविषयक ७९५ गुन्हे दाखल झाल्याचे दिसून येते.

प्रकार             एप्रिल २३ अखेर            एप्रिल २२अखेर २०२२ २०२१

विवाहितेला क्रूर वागणूक - १८७ - १३५- ४८९ -३२७

बलात्कार - १११ - १०० - ३०५ - २२९

विनयभंग             २३७ -             १९३ -             ५७८ -             ३८५

अपनयन/अपहरण २६० -             २३९-             ७६९ -             ६०४

....................................................................................................................

एकूण -                         ७९५ -             ६६७ -             २१४१ - १५४५

Web Title: 9 women are molested every day in Pune city pune latest crime news marathi batmya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.