पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:28 IST2025-05-16T13:27:46+5:302025-05-16T13:28:18+5:30
लहान लहान पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते, त्यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो

पुण्यात नालेसफाईची ८५ टक्के कामे पूर्ण; महापालिका प्रशासनाचा दावा
पुणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून शहरातील नाले, पावसाळी लाईन, चेंबर दुरुस्ती व साफसफाईची कामे हाती घेतली असून नालेसफाईची ८५.७१ टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
महापालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे, नाले, पावसाळी गटारे, चेंबर आदींची साफसफाई आणि राडारोडा उचलण्याची कामे केली जातात. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरण केले जाते. ही कामे दरवर्षी एप्रिलमध्ये सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले जाते. मात्र, लहान लहान पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते, चेंबर तुंबतात, रस्त्यावर पाणी साचते. त्यामुळे पावसाळी कामे होण्यावर संशय व्यक्त केला जातो.
महापालिका प्रशासनाने यंदाही पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांसाठी वेगवेगळ्या निविदा काढल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयामार्फत २३ निविदा काढण्यात आल्या. तर समाविष्ट २३ गावांसाठी आठ अशा एकूण ३१ निविदा काढण्यात आल्या आहेत. या निविदाही दरवर्षीप्रमाणे कमी दरानेच आलेल्या आहेत. ही मे अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. महापालिका प्रशासनाने आत्तापर्यंत ८५. ७१ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. ही कामे करण्यासाठी ७ जूनचे उद्दिष्ट ठेवले असून, ही कामे वेळेत पूर्ण करायचे आहे.
महापालिका हद्दीत ६४७ किमी नाले
- महापालिकेच्या जुन्या हद्दीत २३४ मुख्य व उपनाले आहेत.
- समाविष्ट ११ गावांमध्ये १६४ मुख्य व उपनाले आहेत.
- समाविष्ट २३ गावांमध्ये प्राथमिक सर्वेनुसार ४२ मुख्य व उपनाले आहेत.
- यांवर ८० कल्व्हर्ट व १२ बंधारे आहेत.
- पावसाळी गटारी - ३२५ किमी
- चेंबरची संख्या - ५५,३००
पावसाळी पूर्व कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महापालिका आणि समाविष्ट गावांमध्ये सुमारे २५ कोटी रुपयांचे कामे केली जात आहेत. त्यात १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये १३.४० कोटी रुपयांची तर समाविष्ट २३ गावांमध्ये सुमारे १२ कोटी रुपयांची कामे प्रत्यक्षात सुरु आहेत. काही कामे कोणत्याही परिस्थितीत ७ जूनपूर्वी पूर्ण केली जाणार आहेत. - संतोष तांदळे, अधीक्षक अभियंता, ड्रेनेज विभाग मनपा, पुणे