पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. १३) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालावरून शतकी खेळी केलेल्या विद्यार्थी आणि शाळांची संख्यादेखील कमालीची असल्याचे दिसून येते. यात राज्यातील एकूण २३ हजार ४८९ पैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. त्याचबराेबर उत्तीर्ण १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थ्यांपैकी २११ विद्यार्थ्यांनी शतकी खेळी केली आहे. यातील सर्वाधिक ११३ विद्यार्थी लातूर विभागाचे असून, नाशिक विभागातील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे; तसेच ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्यांमध्ये २८५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या २११ विद्यार्थ्यांची विभागनिहाय संख्या पाहता लातूर विभाग सर्वांत पुढे असून, तब्बल ११३ विद्यार्थी येथील आहेत. त्यापाठाेपाठ छत्रपती संभाजीनगर येथील ४०, पुणे १३, काेल्हापूर १२, अमरावती ११, काेकण ९, मुंबई ८, नागपूर ३ आणि नाशिक येथील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
काठावर उत्तीर्ण हाेणाऱ्यांमध्ये मुंबईकर पुढे
राज्यात दहावी परीक्षेत काठावर म्हणजे अगदी ३५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण हाेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २८५ आहे. यापैकी सर्वाधिक ६७ विद्यार्थी मुंबई विभागातील आहेत. त्यापाठाेपाठ अनुक्रमे नागपूर ६३, पुणे ५९, छत्रपती संभाजीनगर २८, अमरावती २८, लातूर १८, काेल्हापूर १३, नाशिक येथील ८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात काेकण विभागातील एकही विद्यार्थी नाही. एटीकेटी मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजार ३९३ इतकी आहे.
विभागनिहाय टक्केवारी
पुणे - ९४.८१
नागपूर - ९०.७८छत्रपती संभाजीनगर - ९२.८२
मुंबई - ९५.८४कोल्हापूर - ९६.८७
अमरावती - ९२.९५नाशिक - ९३.०४
लातूर - ९२.७७कोकण - ९८.८२