प्राध्यापक महिलेच्या अपघाती मृत्यूप्रकरणात ७७ लाख ५८ हजार नुकसान भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 19:08 IST2018-12-22T19:07:53+5:302018-12-22T19:08:30+5:30
प्राध्यापक महिला दुचाकीवरून निघाल्या असताना त्यांचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता.

प्राध्यापक महिलेच्या अपघाती मृत्यूप्रकरणात ७७ लाख ५८ हजार नुकसान भरपाई
पुणे : टँकरने धडक दिल्याने प्राध्यापक महिलेच्या मृत्यूप्रकरणात पती आणि मुलाला ७७ लाख ५८ हजार २०० रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. सत्र न्यायाधीश आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे प्रमुख सदस्य एस. एम. मेनजोगे यांनी हा निकाल दिला. टँकरचे मालक आणि विमा कंपनी असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.च्या विरोधात १८ एप्रिल २०१६ रोजी हा दावा दाखल करण्यात आला होता. अपघाताची घटना २५ जानेवारी २०१६ रोजी घडली होती. प्राध्यापक महिला दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्यावेळी टँकरने पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हडपसर पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्या मॉडर्न महाविद्यालयात बॉटनी या विषयाच्या प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्या पीएच.डी. करत होत्या. त्यांना दरमहा ५७ हजार ६५१ रुपये पगार होता. या पार्श्वभूमीवर त्यांचे वय, उत्पन्न, अवलंबून असलेल्या व्यक्ती, भविष्यकाळात पगाराची होणारी वाढ लक्षात घेता २ कोटी रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करणारा दावा पती व मुलाने अॅड. रामदास कुटे, अॅड. बी. एस. रणदिवे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. संबंधित रक्कमेवर दावा दाखल केलेल्या तारखेपासून ७ टक्के वार्षिक दराने व्याज देण्यात यावे, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे. प्राध्यापक महिलेचा पती कमविता होता. तर, मुलगा लहान होता. जरी पती कमवित असला तरीही, मतय प्राध्यापिकेचे उत्पन्नही कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण होते. कमवित्या महिलेचे स्थान समाजात पुरुषांप्रमाणेच महत्त्वाचे असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.