पुण्यात २३ लाखांचा तब्बल ७४ किलो गांजा जप्त; शहराच्या 'या' भागांमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 19:31 IST2026-03-20T19:30:49+5:302026-03-20T19:31:01+5:30
पुण्यात दिवसाढवळ्या गांजा विक्री होत आहे, तसेच पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गांजा मिळत आहे

पुण्यात २३ लाखांचा तब्बल ७४ किलो गांजा जप्त; शहराच्या 'या' भागांमध्ये पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : पुण्याच्या वाघोली आणि बाणेर परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत २३ लाखांचा तब्बल ७४ किलो गांजा मुद्देमालासहित जप्त केला आहे. वाडेबोल्हाई येथे मंदिराजवळील टेकडीच्या बाजूला बेकायदेशीर विक्रीकरिता गांजा बाळगल्याने गुन्हे शाखा युनिट ७ च्या पोलिसांनी कारवाई केली असून पाच जणांवर एनडीपीएस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ५८ किलो ५८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
भिवा वाघमोडे, विष्णू वाघमोडे,हरी ढवळे,मनोज सुरवसे(चौघेही रा.सोलापूर)असे गांजा बाळगल्या प्रकरणी तर विक्रीसाठी गांजा देणारा कैलास गोडविंदे (रा.भिवंडी)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट ७ च्या पोलिसांच्या पथकाला टेकडीजवळ एक संशयित स्विफ्ट कार दिसली. पोलीस कारजवळ जात असताना कारमधील संशयित पळून जाऊ लागल्याने चौघांना पोलिसांनी पकडले. पोलिसांना कार मध्ये गोण्यामध्ये भरलेला गांजा मिळून आला. त्यांच्याकडून गांजा,कार,मोबाईल असा १७ लाख ११ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. पकडलेले चौघे व गांजा विक्रीसाठी देणाऱ्या एकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बाणेरमध्ये १६ किलो गांजासह दोघांना अटक; ६.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
बाणेर परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोन जणांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १६ किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई दि. १६ मार्च २०२६ रोजी गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग आणि त्यांच्या पथकाने ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात सापळा रचला होता. रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन संशयितांना पोलिसांनी थांबवून चौकशी केली. त्या वेळी त्यांची नावे अभिषेक भिका बोरसे (वय २४) आणि अक्षय भिका बोरसे (वय २१) अशी असल्याचे समोर आले. त्यांच्या ताब्यातील बॅगची तपासणी केली असता सुमारे ३.०३४ किलो गांजा आढळून आला. पुढील तपासादरम्यान त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता आणखी १३.०८८ किलो गांजा, इलेक्ट्रॉनिक काटा, चिकटपट्टी व इतर साहित्य असा एकूण सुमारे ६.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सुरू आहे.