पुणे शहरातील ४२ टक्के अंत्यसंस्कार एकट्या वैकुंठात; ताण कमी करण्यात प्रशासनाला अपयश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:52 IST2025-10-10T13:50:34+5:302025-10-10T13:52:11+5:30
महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला देऊन १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मूळ हद्दीसह नवीन समाविष्ट गावांमध्ये तब्बल १५० स्मशानभूमी व दफनभूमी आहेत

पुणे शहरातील ४२ टक्के अंत्यसंस्कार एकट्या वैकुंठात; ताण कमी करण्यात प्रशासनाला अपयश
हिरा सरवदे
पुणे : नागरिकांना जवळच्या परिसरात अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिकेने शहराच्या सर्वच भागांत जवळपास १५० ठिकाणी स्मशानभूमी व दफनभूमींची व्यवस्था केली आहे. मात्र, शहराच्या मध्यवर्ती असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीत शहरातील ४२.३० टक्के मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. यावरून वैकुंठावरील ताण कमी करण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप यश आले नसल्याचे स्पष्ट होते.
महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला देऊन १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मूळ हद्दीसह नवीन समाविष्ट गावांमध्ये तब्बल १५० स्मशानभूमी व दफनभूमी आहेत. यामध्ये पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी शेड, विद्युत दाहिन्या, गॅस दाहिन्यांसह मुस्लिम, ख्रिश्चन आणि लिंगायत समाजासाठी विविध ठिकाणच्या दफनभूमी यांचा समावेश आहे. नागरिकांना जवळच्या परिसरात अंत्यसंस्काराची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शहराच्या सर्वच भागांत स्मशानभूमी व दफनभूमींची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, महापालिका प्रशासनाकडील नोंदीनुसार मार्च २०२४ ते मे २०२५ या कालावधीत शहरात एकूण २६ हजार ६२१ मृतदेहांवर शहरातील विविध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यातील ४२.३० टक्के म्हणजे ११ हजार २६१ मृतदेहांवर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवर व तेथील मनुष्यबळावर मोठ्या प्रमाणात ताण येत असून परिसरातील वायुप्रदूषण आणि दुर्गंधीमध्ये वाढ होते.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (‘नीरी’) या शासकीय संस्थेकडून वैकुंठ स्मशानभूमीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर नीरीने येथील अंत्यसंस्काराची संख्या आणि वायुप्रदूषण कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानंतर महापालिकेकडून काही उपाययोजना करण्याची घोषणा करण्यात आली होती. नागरिकांनी आपल्या नातेवाइकांचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या परिसरातीलच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावेत, यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. आजही उपनगरांमधून वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आणले जातात.
वैकुंठातील अंत्यसंस्काराची संख्या वाढण्याची कारणे
- ही स्मशानभूमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे.
- समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचे निधन झाल्यानंतर वैकुंठातच अंत्यसंस्कार केले जातात.
- वैकुंठामध्ये अंत्यसंस्कार करणारे गुरुजी व इतर सोयी सुविधा विनाविलंब उपलब्ध होतात.
- उपनगरांसह परगावहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी सोयीचे ठिकाण.
- पेठांमधून उपनगरांमध्ये स्थलांतर केलेले बहुसंख्य नागरिक घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी वैकुंठलाच प्राधान्य देतात.
इतर स्मशानभूमीमध्ये या सुविधा हव्यात
- स्मशानभूमीत पालिकेचे कर्मचारी वेळेवर उपस्थित नसतात, त्यांची उपस्थिती असणे गरजेचे आहे.
- स्मशानभूमीच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.
- अंत्यविधी करणाऱ्या गुरुजींची व्यवस्था असणे गरजेचे आहे.
इतर स्मशानभूमी व वैकुंठ स्मशानभूमीतील अंत्यसंस्कार (मार्च २०२४ ते मे २०२५)
पारंपारीक पद्धतीने अंत्यसंस्कार - ८३०३
गॅस दाहिनी - ४३१३
विद्युत दाहिनी - २७४४
एकूण - १५३६०
वैकुंठ स्मशानभूमी
पारंपारीक पद्धतीने अंत्यसंस्कार - ३४३२
गॅस दाहिनी - १५१३
विद्युत दाहिनी - ६३१६
एकूण - ११२६१
अंत्यसंस्क्रासाठी महापालिकेची व्यवस्था
- विद्युत दाहीन्या – १२
- गॅस दाहीन्या – २२
- विद्युत गॅस (हायब्रीड) – १
- पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी - १४९ शेड (३३ शेडमध्ये हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा)