पुण्याला पाणीपुरवठा करणारी ४ धरणं फुल्ल; २८.४८ टीएमसी पाणीसाठा, आतापर्यंत सोडले २३ टीएमसी पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:00 IST2025-08-30T18:00:19+5:302025-08-30T18:00:26+5:30
पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्यावर शनिवारी विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. यावेळी चारही धरणे मिळून एकूण पाणीसाठा २८.४८ टीएमसी अर्थात ९७.७३ टक्के झाला आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणारी ४ धरणं फुल्ल; २८.४८ टीएमसी पाणीसाठा, आतापर्यंत सोडले २३ टीएमसी पाणी
पुणे : घाटमाथ्यावर होत असलेल्या जोरदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पात आतापर्यंत २८.४८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात आला असून, आतापर्यंत सुमारे २३ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे. धरण क्षेत्रात शनिवारी पाऊस थांबल्याने विसर्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ३ हजार मिलिमीटरचा टप्पा गाठला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे फुल्ल झाली आहेत. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील पाण्याचा येवा वाढला होता. परिणामी, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग २१ ऑगस्ट रोजी सर्वोच्च अर्थात ३९ हजार १३८ क्युसेक इतका करण्यात आला होता. त्यानंतर पाऊस कमी झाल्याने विसर्गही कमी करण्यात आला. पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबल्यावर शनिवारी (दि. ३०) विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. या वेळी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे मिळून एकूण पाणीसाठा २८.४८ टीएमसी अर्थात ९७.७३ टक्के झाला आहे.
यंदा मे महिन्यातच चांगला पाऊस झाल्याने धरणांमध्ये पाणीसाठा जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे जूनमध्ये झालेल्या पावसामुळे १६ जूनपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग करण्यास सुरुवात झाली. या दिवशी धरणांमध्ये ३० टक्के पाणीसाठा जमा झाला होता. धरणे भरल्यानंतर तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे मुठा नदीत विसर्ग सुरूच असून, आतापर्यंत २२.८३ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या वर्षी एकूण ३३.३५ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते.
खडकवासला धरण परिसरात आतापर्यंत चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ३ हजार मिलिमीटरचा टप्पा गाठला आहे. तर, वरसगावमध्ये १९३०, पानशेतमध्ये १९३४ व खडकवासला धरण परिसरात ६२२ मिलिमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाने केली आहे.
धरणांतील पाणीसाठा
धरण--टीएमसी--टक्के
खडकवासला १.५५--७८.३९
पानशेत १०.५६--९९.१२
वरसगाव १२.६८--९८.९८
टेमघर ३.७१--१००
एकूण २८.४९--९७.७३
गेल्या वर्षीचा साठा २८.६७--९८.३४