डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 15:33 IST2024-08-11T15:32:37+5:302024-08-11T15:33:32+5:30
वसतिगृहामध्ये स्वच्छता राहावी, विद्यार्थ्यांना मच्छरदाणी द्यावी, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या होत्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं?
पुणे: महापालिकेच्या घोले रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या अधीक्षक, रखवालदार, सफाई कर्मचाऱ्यांसह आणखी २१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने केलेला उपाययोजनांचे पितळ उघडे पडले आहे. याच वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना मागील काही दिवसांपूर्वी घडली होती.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी वसतिगृहाला भेट दिल्यानंतर वसतिगृह प्रशासनाने मच्छरदाणी, खिडक्यांना नेट लावणे, नियमित स्वच्छता करणे, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या रॅम्पच्या परिसरात स्वच्छता करणे, आदी उपाययाेजना केल्या. तसेच वसतिगृहातील अन्य विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता शुक्रवारी आणखी दहाजणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदान झाले हाेते. शनिवारी आणखी २१ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पुढे आली. लागण झालेल्या सर्वांना नायडू हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपूर्वी दोन विद्यार्थ्यांचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी वसतिगृहाला भेट दिली होती. ‘वसतिगृहामध्ये स्वच्छता राहावी, यासाठी सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना मच्छरदाणी, खिडक्यांना जाळ्या बसविणे, ढेकणांचा त्रास होऊ नये, यासाठी फायर गनने ते नष्ट करणे अशा उपाययोजना सांगितल्या होत्या. तेव्हा विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १० डेंग्यूने बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांना उपचारांसाठी बाणेर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. आता वसतिगृहातील अधीक्षक, रखवालदार, सफाई कर्मचाऱ्यांसह आणखी विद्यार्थ्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. काही विद्यार्थ्यांना कुठलीच लक्षणे नसल्याचेही निदर्शनास आले असल्याचे महापालिकेच्या सामाजिक विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी सांगितले आहे.