२०० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा; पेशवांच्या आमराईवर महापालिकेचा डोळा, वृक्षांवर चालणार कुऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:35 IST2026-02-13T10:34:50+5:302026-02-13T10:35:51+5:30
जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या जागेत महापालिका प्रकल्पासाठी अनेक दुर्मीळ आणि ३५० वर्षांहून अधिक जुनी झाडे तोडण्याची भीती आहे

२०० वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक वारसा; पेशवांच्या आमराईवर महापालिकेचा डोळा, वृक्षांवर चालणार कुऱ्हाड
पुणे : राज्य सरकारने गणेशखिंड वनस्पती उद्यानाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. त्या ठिकाणी पेशव्यांनी लावलेली आंब्याचे बन आहे. अनेक औषधी वनस्पती आहेत. तेथील वृक्षांचे वय शंभर-दोनशे वर्षांहून अधिक आहे. हा सर्व ऐतिहासिक हिरवाईचा वारसा आता संकटात सापडला आहे. या उद्यानातील जागेवर महापालिकेला डोळा असून, तेथील वृक्षांवर कुऱ्हाड पडणार आहे. परंतु, हा हिरवा जैवविविधतेचा वारसा जतन व्हावा, यासाठी पुणेकरांनी त्याला तीव्र विरोध केला आहे.
पुण्यातील गणेशखिंड येथील ‘शासकीय फळबाग व वनस्पती उद्यान’ हे भारतातील तीनपैकी एक ‘जैवविविधता वारसा स्थळ’ आहे. म्हणूनच त्याला राज्य सरकारने हेरिटेज वारसा म्हणून घोषित केले. या ठिकाणी आता पुणे महापालिका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारणार आहे. त्यासाठी ३० गुंठे जमीन त्यांना हवी आहे. या ऐतिहासिक उद्यानात शतकांहून अधिक जुनी झाडे आहेत. ती वाचवण्यासाठी पुण्याच्या ‘पुणे संवाद’ आणि ‘चलो पीएमसी’ या नागरिकांनी चळवळ सुरू केली आहे. तसेच राष्ट्रीय हरित लवादामध्येही पीटीशन दाखल केले आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन बोधनी हे देखील हा वारसा वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
महापालिकेने प्रकल्पासाठी ३० गुंठे जागा निवडली असून, तिथे अनेक दुर्मीळ आणि ३५० वर्षांहून अधिक जुनी झाडे आहेत, जी तोडण्याची भीती आहे. ही पुण्याच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. या उद्यानाला ‘नॅशनल हेरिटेज’चा दर्जा आहे. ३० गुंठे जागा ही सांख्यिकीय दृष्ट्या छोटी वाटू शकते, पण पर्यावरणाच्या दृष्टीने ती अमूल्य आहे. एक तज्ज्ञ म्हणून माझे असे मत आहे की, तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटीपी प्रकल्पाची जागा बदलणे सहज शक्य आहे.’’
वारसा स्थळाचे महत्त्व आणि भीती
१५० एकरमध्ये पसरलेले हे उद्यान पुण्याचे ‘फुफ्फुस’ मानले जाते. येथे ६१० हून अधिक प्रजातींचा बीज साठा असून ४,५०० हून अधिक झाडे आहेत. नागरिक गटांच्या या मोहिमेचा उद्देश असा आहे की, जर भविष्यात ही जागा ‘ओसाड’ असल्याचे भासवून तिथे बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला, तर आज केलेली ही वृक्ष मोजणी कायदेशीर आणि वैज्ञानिक पुरावा म्हणून समोर येईल.
एसटीपीला विरोध नाही, इतरत्र करा !
‘पुणे संवाद’ आणि ‘चलो पीएमसी’ या गटांचा एसटीपी साकारण्यासाठी विरोध नाही. पण जैवविविधता उद्यानातील झाडे कापून त्या ठिकाणी करू नये, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. उद्यानातील ३० गुंठे जागेवरील आरक्षण रद्द करून एसटीपी प्रकल्प पर्यायी जागेवर नेण्यात यावा.
झाडे कापून प्रकल्प कशासाठी?
गणेशखिंड जैवविविधता उद्यान सरकारनेच वारसा घोषित केले आणि आता तेच त्यात बांधकाम करण्यासाठी परवानगी देत आहेत. खरंतर महापालिकेने यापूर्वी वारसा म्हणून मान्यता दिली आणि त्यांनी तिथे बांधकामासाठी परवानगी मागितली. हा विरोधाभास आहे. इतर ठिकाणी जागा आहे, तिथे प्रकल्प उभारावा. ही जागा सरकारची असल्याने ती मिळेल, अशी भावना महापालिकेने ठेवू नये. त्याला आमचा विरोध आहे. - रेखा जोशी, सदस्य, पुणे संवाद