अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या २ दलालांना अटक; कोंढव्यातील संतापजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:05 IST2026-02-24T10:02:27+5:302026-02-24T10:05:19+5:30
वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून तिच्या वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून ठरावीक रक्कम स्वतःसाठी घेऊन उपजीविका करीत असल्याचा प्रकार

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या २ दलालांना अटक; कोंढव्यातील संतापजनक घटना
पुणे : अल्पवयीन मुलीला पैशांचे आमिष आणि धाकदपटशा दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करून तिच्या वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून ठरावीक रक्कम स्वतःसाठी घेऊन उपजीविका करीत असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाने केलेल्या कारवाईमधून समोर आला आहे.
शहरातील एका इमारतीच्या सदनिकेत हा वेश्याव्यवसाय सुरू होता. यावेळी एका पीडित अल्पवयीन मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका करून दोघा दलालांना अटक करण्यात आली. गुलनाज रफिक शेख (वय २५), इस्माईल इब्राहीम खान (वय ३२, रा. दोघे भाग्योदयनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस हवालदार तुषार भिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवापोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कायद्यासह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.