Video: आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:24 IST2025-10-10T15:21:16+5:302025-10-10T15:24:04+5:30
दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे

Video: आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ...
अवसरी : आंबेगाव तालुक्याचे पुर्व भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. अवसरी खुर्द कौलीमळा येथे गुरुवारी रात्री सात वाजता सुधीर दत्तात्रय भोर ट्रॅक्टर चालवत असताना त्यांना पूर्ण वाढ झालेले दोन बिबटे मुक्तपणे फिरताना दिसले असून त्यांनी बिबट्याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये चित्रीत केला आहे. बिबट्याच्या दहशतीने गावातील मुख्य बाजारपेठेत रात्री सात नंतर सामसूम होते. ग्राहक नसल्याने किराणा दुकानदार अडचणीत आले आहेत. याचबरोबर बिबट्याच्या भितीने शालेय विद्यार्थ्यांना पालक दररोज नेण्यासाठी येत असतात. वनविभागाने तातडीने कौलीमळा येथे पिंजरा लावावा अशी मागणी भाजपचे मेघश्याम भोर यांनी केली आहे.
आंबेगाव तालुक्यात २ बिबट्यांचा मुक्त संचार; शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवताना काढला व्हिडिओ...#Pune#ambegaon#manchar#leopard#farmerpic.twitter.com/ozhZOGvBb6
— Lokmat (@lokmat) October 10, 2025
अवसरी खुर्द गावात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच ओढ्याला बारा माही पाणी वाहत असल्याने बिबट्याला अन्नपानी व लपन क्षेत्र मोठ्या प्रमाणात तयार झाल्याने बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढला आहे. बिबट्याने दोन महिन्यापूर्वी सुनील भोर यांच्या चार ते पाच शेळ्या मारून टाकल्या होत्या. नंतर वन विभागाने गणपती कारखान्याजवळ पिंजरा लावला होता. मात्र महिनाभर पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद झाला नाही. मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मधला टेमकर मळा येथील शांताराम टेमकर यांच्या भावाचा मुक्त शेळी गोठ्यात बिबट्याने वीस हजार रुपये किमतीची शेळी मारून टाकली होती. गुरुवार दिनांक ९ रोजी रात्री सात वाजता सुधीर भोर हे शेतात ट्रॅक्टर चालवत असताना त्यांना ट्रॅक्टरच्या लाईटच्या उजेडात दोन बिबटे फिरताना दिसले आहेत. त्यांनी त्यांचा व्हिडिओ मोबाईल मध्ये काढला आहे. दिवसेंदिवस या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने कायमस्वरूपी त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी मेघश्याम भोर यांनी केली आहे.
मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की अवसरी खुर्द गावात गेले तीन ते चार महिन्यापासून पूर्ण वाढ झालेले बिबटे फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे. टेमकरमळा, पंधरा बिघा, कॉलेज रोड, कौलीमळा परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्यांनी शेळी, मोटरसायकल चालकांवर हल्ले केले आहेत. हल्ले केलेल्या शेळी मालकांना नुकसान भरपाई दिली आहे. दोन दिवसात कौलीमळा परिसरात पिंजरा लावला जाईल.