वर्षभरापूर्वी २ मुलांचं निधन; नैराश्यातून वडिलांनी गळफास घेऊन संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:03 IST2021-09-23T13:03:26+5:302021-09-23T13:03:55+5:30
सिंहगड रस्ताच्या नांदेड फाटा येथील घटना

वर्षभरापूर्वी २ मुलांचं निधन; नैराश्यातून वडिलांनी गळफास घेऊन संपवलं जीवन
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील नांदेड फाटा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. संजीव दिगंबर कदम (वय: ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हवेली पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीव कदम हे पत्नीसह नांदेड फाटा परिसरात राहावयास होते. वर्षभरापूर्वी संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा व दहा वर्षांची मुलगी या दोघांचेही काही दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. दोन्ही मुलं गेल्यापासून कदम हे निराश असायचे. नुकतेच त्यांनी पत्नीला नांदेड जिल्ह्यातील गावी माहेरी सोडून आले होते.
सोमवारी दुपारपासून त्यांची पत्नी फोन लावत होती, मात्र ते फोन उचलत नसल्याने त्यांनी ओळखीच्या काहींना फोन करुन घरी जाऊन पाहावयास सांगितले. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता संजीव कदम यांनी पंख्याला गळफास घेतलेल्या दिसून आले. याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवेली पोलीस पुढील तपास करीत आहेत.