२ दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 17:23 IST2026-02-03T17:23:36+5:302026-02-03T17:23:57+5:30
दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू तर तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

२ दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील घटना
ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर–ब्राह्मणवाडा जिल्हा मार्गावर ओतूर गावाच्या हद्दीतील फापाळेशिवार येथे सोमवारी (दि. २) रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वसंत सुरेश मुठे (वय २८, रा. त्रिशुलवाडी सातेवाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल लक्ष्मण गिते (रा. राहाटी मळा, ओतूर, ता. जुन्नर) हे दुचाकीवरून ओतूरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी वसंत मुठे व त्यांचा मित्र अक्षय पांडुरंग मोढवे हे दुचाकीवरून ओतूरहून ब्राह्मणवाड्याकडे निघाले होते. दरम्यान, फापाळेशिवार हद्दीत दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील तिन्ही तरुण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना आळेफाटा येथील युनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना वसंत मुठे यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अमोल लक्ष्मण गिते याच्याविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.