१६ वर्षे उलटली, अनुत्तरित प्रश्न आजही कायम; जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी तपासावर गंभीर शंका - एस. एम. मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:57 IST2026-02-13T11:56:33+5:302026-02-13T11:57:34+5:30
एटीएसने महत्वाच्या पुरव्यांकडे दुर्लक्ष करून स्फोट मोबाइलच्या अलार्म यंत्रणेने झाल्याची भूमिका घेत तपासाची दिशा बदलल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे

१६ वर्षे उलटली, अनुत्तरित प्रश्न आजही कायम; जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी तपासावर गंभीर शंका - एस. एम. मुश्रीफ
पुणे : कोरेगाव पार्क येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी जर्मन बेकरीत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला १६ वर्षे उलटून गेली तरी या प्रकरणातील तपासाबाबत अनेक अनुत्तरित प्रश्न आजही कायम असल्याचा दावा पोलिस निरीक्षक (नि.) एस. एम. मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविण्यात आला होता.
एस. एम. मुश्रीफ म्हणाले, घटनास्थळी नॅशनल सेक्युरिटी गार्डचे तज्ज्ञ कर्नल एन. एस. मान आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी, हैदराबादचे डॉ. गोपीनाथ यांनी पाहणी केली होती. त्यांच्या मते, स्फोट मोबाइल फोनचा रिमोट कंट्रोल म्हणून वापर करून करण्यात आला असावा आणि घटनास्थळी सापडलेले एअरटेल कंपनीचे सिमकार्ड हा महत्त्वाचा पुरावा होता. मात्र, एटीएसने या शास्त्रीय मताकडे दुर्लक्ष करून स्फोट मोबाइलच्या अलार्म यंत्रणेने झाल्याची भूमिका घेत तपासाची दिशा बदलल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, गोवा पोलिस व एनआयएच्या तपासात सारंग कुलकर्णी नावाच्या संशयिताचा या स्फोटाशी संबंध असल्याची माहिती समोर आली होती. ही माहिती एटीएसला देण्यात आली होती, मात्र संबंधित व्यक्तींची सखोल चौकशी झाली नसल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला. दरम्यान, या प्रकरणात हिमायत बेग याला अटक करून पुणे सत्र न्यायालयाने २०१३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, १७ मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जर्मन बेकरी स्फोटप्रकरणी त्याची निर्दोष मुक्तता केली. उदगीर येथे स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात मात्र जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील प्रलंबित असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले. संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष फेरतपास व्हावा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.