HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 13:41 IST2025-05-05T13:39:34+5:302025-05-05T13:41:27+5:30
राज्यात ३३७३ केंद्रांपैकी १२४ केंद्रावर गैरप्रकार आढळल्याने त्यांची चौकशी होणार असून त्यामध्ये त्रुटी आढळल्यास ती केंद्र कायमस्वरूपी बंद करणार

HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली आहे.
राज्यात ३३७३ केंद्रांपैकी १२४ केंद्राची चौकशी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. या केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने चौकशी होणार आहे. या चौकशी दरम्यान त्रुटी आढळल्यास १२४ परीक्षा केंद्रांवर कारवाई करून कायमस्वरूपी बंद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यात ४५, नागपूर ३३ छत्रपती संभाजी नगर, २१४, मुंबई ९ , कोल्हापूर ७, अमरावती १७, नाशिक १२, लातूर ३७ असे एकूण ३७४ कॉपी प्रकार उघडकीस आले आहेत. पुणे २ संभाजीनगर ७ मुंबई २ अशा ११ कॉपी प्रकरणी एफ आय आर दाखल परीक्षा वेळी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
"राज्यात ११ फेब्रुवारी ते मंगळवार,१८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होत्या. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली, ३७ ट्रान्सजेंडर. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती, तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.
विभागनिहाय निकाल
पुणे-९१.३२ टक्के
कोकण- ९६.७४ टक्के
नागपूर- ९१.३२ टक्के
छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के
मुंबई- ९२.९३ टक्के
कोल्हापूर- ९३.६४ टक्के
अमरावती- ९१.४३ टक्के
नाशिक – ९१.३१ टक्के
लातूर – ८९.४६ टक्के