अकरावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; दौंडमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 17:21 IST2022-12-18T17:21:41+5:302022-12-18T17:21:49+5:30
प्रेम प्रकरणातून सोमनाथ याला काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्याची चर्चा

अकरावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; दौंडमधील धक्कादायक घटना
वासुंदे : रोटी (ता. दौंड ) येथे घरात इयत्ता ११ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन शनिवार दि. १७ रोजी आत्महत्या केली. या विद्यार्थ्याचे नाव सोमनाथ बाळू वेताळ (वय १७) असे आहे.
याबाबत या विद्यार्थ्याची आई आशाबाई बाळू वेताळ यांनी पोलिसांना खबर दिली. यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, आई व माझा मुलगा सोमनाथ रोटी येथील धुमाळ वस्ती रोडवर असलेल्या घरात राहत असून सोमनाथ हा वरवंड येथे इयत्ता ११ वी मध्ये शिकत होता. शनिवार दि. १७ रोजी सकाळी ९ चे सुमारास आईला पुणे येथे जायचे असल्याने सोमनाथने मोटारसायकलवरून पाटसला सोडले.
आईने दुपारी १ वाजता सोमनाथला फोन करून जेवण केले का असे विचारले असता त्याने जेवलो म्हणून सांगून फोन ठेवला. परत दुपारी ३ वाजता आईला कामावरून येण्यास उशीर होईल हे सांगण्यासाठी फोन करत होत्या. परंतु त्याने फोन उचलला नाही. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या दामू जगताप यांना फोन करून विचारले की, सोमनाथ फोन उचलत नाही. सायंकाळी ६ वाजता आई पाटस येथे आल्यावर समजले की, मुलगा सोमनाथ हा गळफास घेतला आहे. दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. परंतु प्रेम प्रकरणातून सोमनाथ याला काही दिवसांपूर्वी मारहाण झाल्याची चर्चा परिसरात आहे.