स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी नाही ? राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 19:24 IST2021-08-09T19:23:44+5:302021-08-09T19:24:10+5:30
local body elections: 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही.'

स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी नाही ? राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
मुंबई: आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. पण, महाविकास आघाडीत काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीनंही स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होईलच असं नाही. आम्ही स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊनच निवडणुकांना सामोरं जाणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवल्या पाहिजेत, अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अनेकदा म्हणाले आत. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. पण, आता स्वतःचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीच स्वबळाचा नारा दिला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही, असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं आहे.
तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक लोक निर्णय घेतील आणि त्यानुसार पक्षाची भूमिका राहणार आहे. तिन्ही पक्ष विरुद्ध भाजप अशीच लढत सर्व ठिकाणी होणार अशी परिस्थिती नाही. काही ठिकाणी भाजपचे अस्तित्व नाही, त्यामुळे काही ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समोरासमोर लढतील. काही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना लढत होणार आहे. ज्याठिकाणी दोन पक्षाची, तीन पक्षाची आघाडी करायची गरज असेल किंवा स्वबळावर लढण्याची गरज असेल ती परिस्थिती बघून निर्णय होणार असल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.