उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनं खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 01:23 PM2021-06-20T13:23:21+5:302021-06-20T13:45:30+5:30

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांवर आरोप

we should rethink about making alliance with bjp shiv sena mla pratap sarnaik writes to cm uddhav thackeray | उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनं खळबळ

उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल; सरनाईकांच्या लेटरबॉम्बनं खळबळ

Next

मुंबई: भारतीय जनता पक्षासोबतची युती तुटली असली तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. ते अजून तुटण्याच्या आधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल, अशा आशयाचं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना कालच पक्षप्रमुख उद्दव ठाकरेंनी स्वबळाची भाषा केल्यास जनता चपलेनं हाणेल, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनं राजकारणात खळबळ उडाली आहे. काँग्रेस एकला चलो रे ची भूमिका सातत्यानं घेत आहे. राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत आहे. अशा परिस्थितीत आपण भाजपसोबत जुळवून घ्यायला हवं, असं सरनाईक यांनी पत्रात म्हटलं आहे. 

स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडे हाणतील; उद्धव ठाकरेंनी भाजपा, काँग्रेसला दिल्या कानपिचक्या

ईडीच्या छापेमारीमुळे अडचणीत आलेल्या शिवसेना आमदार सरनाईक यांच्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीकेची झोड उठवली होती. कंगना राणौत प्रकरणातही त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र आता सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.

जोडीवरून शाल ‘जोड्या’वर का गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

'भाजपशी जुळवून घेतल्यास त्याचा फायदा आमच्या सारख्या काही कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असं मला वाटतं. आपण योग्य तो निर्णय घ्यालच. माझ्या मनात असलेल्या भावना पत्राद्वारे कळवल्या आहेत. लहान तोंडी मोठा घास घेतला आहे. काही चुकले असल्यास दिलगिरी,' असं सरनाईक यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. 'तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,' असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे.

Web Title: we should rethink about making alliance with bjp shiv sena mla pratap sarnaik writes to cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.