जोडीवरून शाल ‘जोड्या’वर का गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

By यदू जोशी | Published: June 20, 2021 11:45 AM2021-06-20T11:45:24+5:302021-06-20T12:21:49+5:30

सत्तेसाठी कोणाची लाचारी पत्करणार नाही या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानाकडे मित्रपक्षांचा दिलेला सूचक इशारा म्हणून बघता येईल. सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या दबावाला आपण बळी पडणार नाही असे त्यांना म्हणायचे असावे असा एक तर्क आहे.

why cm uddhav thackeray indirectly slams congress and bjp over contesting election alone | जोडीवरून शाल ‘जोड्या’वर का गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

जोडीवरून शाल ‘जोड्या’वर का गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

Next

- यदु जोशी

मुंबई - हल्ली उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून इतके बिझी असतात की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांच्याकडे किती वेळ उरतो हा प्रश्नच आहे. एवढ्या व्यग्रतेतही ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, पराभूत उमेदवार, आमदार, शाखाप्रमुखांशी संवाद साधत असतात. लॉकडाऊनच्या काळात झूमचा सर्वाधिक चांगला उपयोग त्यांनी करवून घेतला आहे. मातोश्री, वर्षा अन् सह्याद्रीच्या बाहेर ते फारसे पडत नाहीत पण दृकश्राव्य प्रणालीद्वारे लोकांपर्यंत पोहोचतात. शनिवारी शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला तो शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. ठाकरेंना दोन भूमिकांमध्ये वावरावं लागतं. मुख्यमंत्री म्हणून ते या ना त्या निमित्तानं रोजच बोलतात पण पक्षप्रमुख म्हणून जाहीररीत्या बोलण्याचे प्रसंग आजकाल कमीच येतात. मुख्यमंत्री म्हणून ते अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य करू शकत नाहीत किंवा तसे करण्याचे टाळत असावेत. मुख्यमंत्री पदावर बसून बोलण्याची ‘ठाकरी’ शैली जपता येत नाही. शिवसेनेच्या व्यासपीठावर ती संधी मग ते अशी काही साधतात की विरोधक अन् मित्रांनाही घायाळ करतात. मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुख या पदांची गल्लत होऊ देत नाहीत. पक्षाच्या व्यासपीठावरून बोलताना पक्षाचे कार्यकर्ते, विरोधक, मित्र आणि प्रसिद्धी माध्यमे यांना एक संदेश द्यायचा असतो. उद्धव यांची शैली ही बाळासाहेबांपेक्षा वेगळी आहे. बाळासाहेब टोकदार, आर या पार बोलायचे. उद्धव यांच्या भाषणाचे श्लेष व तर्क माध्यमांना काढावे लागतात. त्यामुळे माध्यमांची कसरत होते. त्यांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ माध्यमे काढतात आणि त्या माध्यमातून उद्धव यांच्या बोलण्याचा हेतू साध्य होऊन जातो. हा चाणाक्षपणा त्यांच्या ठायी आहे. काँग्रेसची स्वबळाची भाषा उद्धवजींच्या रडारवर होती. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अलिकडेच स्वत: मुख्यमंत्री बनण्याची मनीषा व्यक्त करताना काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढेल असं जाहीर केलं. त्यावर उद्धवजी काय बोलतात या बाबत कमालीची उत्सुकता होती. ‘सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात स्वबळाची भाषा कोणी केली तर लोक जोड्याने मारतील’ असा ठाकरी दम त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता दिला. काँग्रेसला त्यांनी अशा प्रकारे शाल‘जोड्या’तले हाणले. सरकारमध्ये जोडीने असलेल्या पक्षाला जोड्याचा डोस त्यांनी पाजला. काँग्रेस स्वबळाची धून वाजवत असल्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये उगाचच गोंधळाचे वातावरण तयार होते. उद्धव यांन ते नको असणारच. त्यामुळेही त्यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या. भाजपच्या काही नेत्यांनीही अलिकडे आम्ही आता स्वबळावरच लढणार असं सांगणं सुरू केलंय, उद्धव यांचा रोख त्यांच्यावरही होता. कोरोना काळातही राजकारण करत असाल तर ते राजकारणाचे विकृतीकरण असल्याचा टोला त्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना हाणला पण फार खोचक वा टोकाची टीका केली नाही किंवा देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांची खिल्लीदेखील उडविली नाही.  त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कोणतीही टीका केली नाही.लसींपासून जीएसटीपर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्यायच चालविला असल्याची टीका होत असताना ठाकरे यांनी त्या विषयाला हात घातला नाही.  पंतप्रधानांशी अलिकडे दिल्लीत त्यांची पाऊणतास चर्चा झाली होती. त्यावेळी एकमेकांचा सन्मान राखण्याचा फॉर्म्युला ठरलेला दिसतो.सत्तेसाठी कोणाची लाचारी पत्करणार नाही या त्यांच्या विधानाकडे मित्रपक्षांचा दिलेला सूचक इशारा म्हणून बघता येईल. सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या दबावाला आपण बळी पडणार नाही असे त्यांना म्हणायचे असावे असा एक तर्क आहे. कोणाची पालखी वाहण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही’ या वाक्याने शिवसैनिकांचा स्वाभिमान नक्कीच जागा होतो पण तीन पक्षांच्या सरकारमध्ये एकमेकांची पालखी उचलावीच लागते हे वास्तव अशा वाक्यानंतरही अनुत्तरितच राहते. त्याचवेळी दुसरा तर्क हा देखील आहे की ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ठाकरे सरकारची कोंडी करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारलादेखील ठाकरे यांनी, केंद्रापुढे लाचार होणार नाही असे सुनावले. 

कोरोनाचा मुकाबला करताना आपल्या सरकारची प्रशंसा होत आहे. राज्याचे प्रशासन उत्तम काम करत आहे. शिवसैनिकांनीही झोकून दिले आहे हे सांगताना मित्रपक्ष राष्ट्रवादी व काँग्रेसलाही ठाकरे यांनी श्रेय द्यायला हवे होते का? कालचे भाषण हे शिवसेनेचे व्यासपीठ असल्याने कदाचित त्यांनी हा श्रेयोल्लेख केला नसावा. सरकारच्या व्यासपीठावरून उद्या ते हा श्रेयोल्लेख करतील अशी आशा आहे.महाराष्ट्राची सीमा ओलांडून राष्ट्रीय राजकारणाच्या दिशेने शिवसेनेची वाटचाल सुरू करण्याचा निर्धार उद्धव ठाकरे पक्षाच्या वर्धापनदिनी व्यक्त करू शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत होता. मात्र, प्रादेशिक अस्मिता हा संघराज्याच्या अविभाज्य घटक असल्याचं नमूद करत, उद्धव यांनी 'जय महाराष्ट्र' हा वडिलोपार्जित वारसा पुढे नेण्याचा मनोदय बोलून दाखवला आहे.

Web Title: why cm uddhav thackeray indirectly slams congress and bjp over contesting election alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app