विनोद तावडे, पंकजा मुंडेंना अखेर भाजपाकडून मानाचं पान, राष्ट्रीय कार्यकारिणीत दिलं स्थान
By बाळकृष्ण परब | Updated: September 26, 2020 16:39 IST2020-09-26T16:27:14+5:302020-09-26T16:39:02+5:30
विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून निवड केली आहे.

विनोद तावडे, पंकजा मुंडेंना अखेर भाजपाकडून मानाचं पान, राष्ट्रीय कार्यकारिणीत दिलं स्थान
नवी दिल्ली - गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षात काहीसे डावलले गेलेले विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना अखेर पक्षाने मानाचे पान दिले आहे. विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय सचिव म्हणून निवड केली आहे. तावडे आणि मुंडेसोबतच विजया रहाटकर, सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या विनोद तावडे यांना गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. तर पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. तेव्हापासून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली नव्हती. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडींनंतर भाजपाची राज्यातील सत्ता गेल्याने आता पक्ष त्यांच्याकडे कोणती जबाबदारी सोपवतो याकडे पक्षातील कार्यकर्त्यांचे आणि त्यांच्या नेत्यांचे लक्ष लागले होते.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने भाजपा केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की। pic.twitter.com/oLGRoSmbPa
— BJP (@BJP4India) September 26, 2020
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील या नव्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधून राष्ट्रीय सहसरचटणीस म्हणून व्ही. सतीश, राष्ट्रीय सचिव म्हणून विनोद तावडे, सुनील देवधर, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून संजू वर्मा, हिना गावित आणि अल्पसंख्याक मोर्चासाठी जमाल सिद्दीकी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
त्याबरोबरच विशेष उल्लेखनीय नियुक्त्यांमध्ये कर्नाटकमधील युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची भाजपाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच आयटी आणि सोशल मीडियाची जबाबदारी अमित मालवीय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी
पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे